कासारवाडीच्या शिवराज बांगरची ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सिलेशन’ इंग्लंड बुकमध्ये ऐतिहासिक नोंद

पिंपरी-चिंचवड | कासारवाडी येथील अवघ्या ८ वर्षांच्या कु. शिवराज जितेंद्र बांगर याने लाठीकाठी या पारंपरिक क्रीडा प्रकारात नेत्रदीपक कामगिरी करत वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सिलेशन (इंग्लंड) या आंतरराष्ट्रीय विक्रम पुस्तकात आपले नाव कोरले आहे.
दि. ११ जानेवारी २०२६ रोजी युनिक इंटरनॅशनल स्कूल, लोहगाव येथे पार पडलेल्या लाठीकाठी स्पर्धेत शिवराजने तब्बल १ तास ११ मिनिटे ११ सेकंद अखंडपणे लाठीकाठी सादर करत जागतिक विक्रम नोंदविला. ही स्पर्धा गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेसाठी तब्बल ५,००० विद्यार्थ्यांमधून शिवराजची निवड झाली होती. कमी वय असूनही दाखवलेल्या विलक्षण सहनशक्ती, एकाग्रता आणि कौशल्यामुळे शिवराजने उपस्थित प्रेक्षकांसह परीक्षकांनाही थक्क केले.

या यशामागे शिवराजचे प्रशिक्षक सुनील सांबारे यांचे मार्गदर्शन तसेच आई-वडिलांचे अथक परिश्रम आणि पाठबळ मोलाचे ठरले. शिवराजच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असून, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
कासारवाडी व पिंपरी-चिंचवड परिसरासाठी ही अभिमानास्पद बाब असून, भविष्यात शिवराजकडून आणखी मोठ्या यशाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.





