ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

मोशी दुर्घटनेचा शहरावर परिणाम; कचरा संकलन विस्कळीत, घराघरांत कचऱ्याचे डबे तुडुंब!

पर्यायी डम्पिंग व्यवस्था नसल्याने महापालिकेसमोर मोठे आव्हान; नागरिकांच्या तक्रारींमध्ये वाढ

पिंपरी-चिंचवड | विशेष प्रतिनिधी ।

मोशी कचरा डेपो येथे झालेल्या भीषण दुर्घटनेचा फटका आता संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराला बसू लागला आहे. दुर्घटनेनंतर डेपोवरील कामकाज मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याने शहरातील घनकचरा संकलन आणि विल्हेवाट व्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. कचरा टाकण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने अनेक भागांमध्ये कचरा संकलन रखडले असून नागरिकांच्या घरातील कचऱ्याचे डबे तुडुंब भरले आहेत. परिणामी, महापालिकेकडे तक्रारींचा ओघ वाढत आहे.

महापालिकेच्या दैनंदिन कचरा व्यवस्थापनाचा मोठा भार मोशी कचरा डेपोवर अवलंबून आहे. मात्र दुर्घटनेनंतर डेपो परिसरात बचावकार्य, यंत्रसामग्रीची हालचाल आणि सुरक्षेच्या कारणास्तव नियमित कचरा विल्हेवाट प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांतून संकलित होणारा कचरा वेळेत डेपोपर्यंत पोहोचत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

शहरातील अनेक सोसायट्या, गृहनिर्माण संस्था आणि दाट लोकवस्तीच्या भागांत दोन ते तीन दिवसांपासून कचरा उचलला गेला नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. घरातील ओला कचरा साचल्याने दुर्गंधी पसरू लागली असून डास, माशा आणि अस्वच्छतेची समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अधिक गंभीर ठरू शकते, अशी नागरिकांची चिंता आहे.

नागरिकांकडून महापालिकेच्या हेल्पलाइन, प्रभाग कार्यालये तसेच सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदवल्या जात आहेत. नियमितपणे कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, तातडीने पर्यायी व्यवस्था करून कचरा संकलन पूर्ववत करण्याची मागणी जोर धरत आहे.

मोशी दुर्घटनेने शहराच्या घनकचरा व्यवस्थापनातील एक मोठी उणीवही अधोरेखित केली आहे. तब्बल लाखो लोकसंख्या असलेल्या शहरासाठी एकाच डेपोवर अवलंबून राहणे किती धोकादायक ठरू शकते, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत कचरा विल्हेवाटीसाठी पर्यायी जागा, अतिरिक्त प्रक्रिया केंद्रे आणि संकट व्यवस्थापनाची ठोस यंत्रणा उभारण्याची गरज आता प्रकर्षाने पुढे आली आहे.

दरम्यान, कचरा संकलन आणि विल्हेवाट व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध पर्यायांची चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळत असली, तरी प्रत्यक्षात नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी ही व्यवस्था किती लवकर कार्यान्वित होते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

कचरा संकलन व्यवस्थेवर परिणाम झालेला नाही. केवळ मोशी कचरा डेपोवर कचरा डम्पिंग बंद आहे. आम्ही पर्यायी जागेचे नियोजन केले आहे. त्या ठिकाणी कचरा साठवला जात आहे. सर्व भागातील संकलन सुरळीत सुरू आहे.
– डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, आरोग्य विभाग.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button