पिंपरी-चिंचवडमध्ये सातवी जिल्हास्तरीय युनिफाईट स्पर्धा उत्साहात
क्रीडा विश्व: २० शाळांतील १८५ खेळाडूंचा सहभाग; अरींजय मार्शल आर्ट्स संघ प्रथम

पिंपरी | पिंपरी-चिंचवड येथे सातवी जिल्हास्तरीय युनिफाईट स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात आणि शिस्तबद्ध नियोजनासह पार पडली. जिल्ह्यातील सुमारे २० शाळांमधील १८५ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, क्रीडा समिती सदस्य तानाजी बारणे, महापालिकेचे क्रीडा अधिकारी दीपक कान्हेरे तसेच विद्यालय काळेवाडीच्या मुख्याध्यापिका हट्टे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना क्रीडेचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच पिंपरी-चिंचवड युनिफाईट संघटना खेळाच्या प्रसारासाठी करत असलेल्या कार्याचे कौतुक केले. शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या युनिफाईट खेळाडूंच्या संख्येचेही त्यांनी विशेष अभिनंदन केले.
हेही वाचा
To The Point: मोशी कचरा डेपो दुर्घटना अन् राजकीय नेत्यांचे अज्ञान!
स्पर्धेत पिंपरी-चिंचवडमधील पाच संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या निकालानुसार अरींजय मार्शल आर्ट्स संघाने प्रथम क्रमांक पटकावला. शौर्य मार्शल आर्ट संघ द्वितीय, तर अल्टिमेट स्पोर्ट्स मार्शल आर्ट्स संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. ‘शिस्तबद्ध संघ’ म्हणून श्री साई गणेश स्पोर्ट्स क्लबला विशेष गौरविण्यात आले.
स्पर्धेचे आयोजन अविनाश पवार, शंकर साबळे, अभिषेक सर आणि प्रफुल सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पिंपरी-चिंचवडचे टेक्निकल डायरेक्टर संदीप माने आणि त्यांचे सहकारी गौतम प्रजापती, विकास यादव, सौरभ माने, चैतन्य रेणवा, सुजल काळे, अथर्व कावरे, नचिकेत अंधारे, अनुज काकडे, देव लोट, धीरा माने, श्रावणी माने, संस्कृती राऊत, हर्षित तिवारी, योगिता बोराडे आणि प्रणव माने यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
पिंपरी-चिंचवडमध्ये युनिफाईट खेळाची वाढती लोकप्रियता पाहून महाराष्ट्र राज्य युनिफाईट संघटनेचे अध्यक्ष संतोष खंदारे आणि सचिव मंदार पनवेलकर यांनी पिंपरी-चिंचवड संघटनेचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पिंपरी-चिंचवड युनिफाईट संघटनेचे अध्यक्ष यशवंत माने यांनी ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना शुभेच्छा देत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित केले.





