PCMC : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ च्या निविदेला अखेर मंजुरी!
स्थायी समिती सदस्या सुलभा उबाळेंचा ‘‘ड्रामा’’ फसला : स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडून ‘‘एक घाव दोन तुकडे’’
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ संदर्भातील कामाला विरोध करीत राजकीय ‘‘ड्रामा’’ करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या स्थायी समिती सदस्य सुलभा उबाळे यांचा ‘‘फियास्को’’ झाला. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी सदरचा विषय मंजुर केला आणि विरोधकांच्या फुग्यातील हवा काढून घेतली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थापत्य विभागाच्या नि.क्र. 29/2025-26 अंतर्गत प्रभाग क्र. २ येथील पेठ क्र. ५/८ (PIECC) मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी ताब्यात आलेल्या उर्वरीत जागेतील स्थापत्य व विद्युत कामे (सुशोभिकरण व आर्ट विषयक कामे – टप्पा क्र. २) करण्यासाठी निविदा प्रकाशित करण्यात आली होती. निविदा प्रक्रियेतून एकूण २ निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी M/s. Dhaneshwar Construction Pvt. Ltd. या ठेकेदाराची निविदा रु. 32,34,74,695/- या At par दराने स्वीकारण्यात आली आहे. या विषयाला शिवसेना शिंदे गटाच्या स्थायी समिती सभापती सुलभा उबाळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सदस्य संदीप वाघेरे यांनी विरोध केला होता.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पुतळा बोऱ्हाडेवाडी-मोशी, प्रभाग क्रमांक 2 मध्ये साकारला जात आहे. वास्तविक, तमाम पिंपरी-चिंचवडकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे. मात्र, निविदा प्रक्रियेतील काही मुद्यांवर बोट ठेवत सुलभा उबाळे यांनी या कामाला स्थायी समितीमध्ये विरोध केला होता. यावर स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी समंजसपणाची भूमिका घेत हा विषय तहबूक ठेवला होता. भारतीय जनता पार्टीची सत्ता असतानाही छत्रपतींच्या कामासंदर्भातील विषय तहकूब ठेवला. यावर स्थानिक नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांनी थेट सर्वसाधारण सभेत आवाज उठवला होता. त्यावेळी सुलभा उबाळे यांनी सभागृहात ‘‘राजकीय ड्रामेबाजी’’ केली होती.
दरम्यान, आज झाले स्थायी समितीच्या सभेत स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे आणि भाजपाच्या सदस्यांनी बहुमताने छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यासंदर्भातील दोन्ही विषय मंजूर केले आहेत. दुसरा विषय विद्युत मुख्य कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली, क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत पेठ क्रमांक 5/8 (PIECC) येथील छत्रपती संभाजी महाराज यांचे पुतळा परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाईसह AR, VR व इतर विद्युत विषयक अनुषंगिक कामे करण्यासाठी Bid Evaluation Methodology – Quality Cost Based Selection (QCBS) या प्रक्रियेनुसार, मे. मुव्हींग 4 पिक्सेल्स प्रा. लि. या ठेकेदाराची निविदा रक्कमेच्या रु. 18,66,09,965/- पेक्षा 7% कमी दराने, रु. 17,35,47,267/- इतकी वाजवी असल्याने व ठेकेदार काम मुदतीमध्ये मानांकनानुसार पूर्ण करण्यास सक्षम असल्यामुळे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनी या ठेकेदाराची निविदा मान्य करण्यास मान्यता दिली आहे.
‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ ही संकल्पना भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांची आहे. त्यांना या अतिभव्य शिल्प उभारणीचे श्रेय दिले जाते. त्यामुळे राजकीय विरोधक पुतळ्याच्या माध्यमातून लांडगे यांना अप्रत्यक्ष ‘टार्गेट’ करण्याचा प्रयत्न सातत्त्याने करीत असतात. पिंपरी-चिंचवड महापालिकेत हजारो कोटी रुपयांची कामे होतात. मात्र, केवळ राजकीय उद्देशाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या ‘‘स्टच्यू ऑफ हिंदुभूषण’’ च्या कामाला विरोध केला जातो. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराची बदनामी राज्यभरात होते, ही बाब नगरसेवक, स्थायी समिती सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी विचारात घेतली पाहिजे, अशी अपेक्षा शिव-शंभू प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पुतळा माझ्या प्रभागात, माझ्या शहरात उभारला जात आहे. राजकारण करण्यासाठी अनेक विषय आहेत. हजारो कोटी रुपयांची कामे होतात. त्यामध्ये विरोधकांनी जरूर चुका काढाव्यात, पण ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ च्या कामामध्ये गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करु नये. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान हीच मंडळी पुतळ्याच्या गुणवत्तेवर बोलत होती. महाराजांच्या कामाचा उपयोग राजकीय स्वार्थासाठी करणे अयोग्य आहे. पुतळ्याच्या प्रस्तावित कामाला तातडीने मंजुरी दिल्याबद्दल स्थायी समिती सभापती आणि सदस्यांची तमाम शिव-शंभू प्रेमींच्या वतीने आभार व्यक्त करते.
– सारिका बोऱ्हाडे, नगरसेविका, भाजपा.





