ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोठी बातमी: मोशी येथील कचरा डेपोवर पुन्हा आग!

महापालिका पर्यावरण विभागाचा भोंगळ कारभार

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका पर्यावरण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मोशी कचरा डेपोमध्ये संपूर्ण शहराचा कचरा आणला जातो. या ठिकाणी ठेकेदाराकडून उघड्यावर कचऱ्याचे डम्पिंग होत असताना महापालिका पर्यावरण विभाग मात्र डोळ्यावर पट्टी बांधून ठेकेदाराची मनमानी गपगुमान सहन करत असल्याचे चित्र आहे. उघड्यावर टाकलेल्या या कचऱ्याने मंगळवारी पेट घेतला. रात्री उशिरापर्यंत या कचऱ्याची आग धुमसत होती.

घटनेची माहिती मिळताच, मुख्य अग्निशमन दलासह भोसरी येथील पथकही मोशी येथे पोहोचले. अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल होत्या. दुपारी साडेचारच्या सुमारास लागलेली आग उशिरापर्यंत धुमसत होती.पाण्याचा मारा करुनही आगीवर नियंत्रण मिळविता येत नव्हते. आग आटोक्यात आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत अथक प्रयत्न केले जात होते. अखेरीस पर्यावरण विभागाकडून या कचऱ्याला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी माती टाकून आग विझवण्याच्या सूचना करण्यात आल्या.

हेही वाचा –  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार ? उद्याच्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष

दरम्यान कचऱ्याला लागलेली आग ही उन्हामुळे लागला असल्याचा अंदाज महापालिका प्रशासनाने वर्तवला आहे. उन्हाळ्यामुळे तापमान वाढल्याने कचर्‍याच्या ढिगार्‍याखाली मिथेन वायुची निर्मिती होते. हवेचा दाब निर्माण झाल्याने ज्वलनशील वायूचे उत्सर्जन होऊन आगीची घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे.

आयुक्तांनी घेतली माहिती

आयुक्त शेखर सिंह हे कामानिमित्ताने शहराबाहेर असल्याने त्यांनी तातडीने पर्यावरण विभागाशी संपर्क साधून संबंधित आगी संदर्भात माहिती घेतली. आग विझवणे संदर्भात सर्व विभागांनी समन्वय साधून तातडीने याबाबत उपाययोजना करण्यात याव्या अशाही आयुक्तांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत.

कचऱ्याच्या आगीचे गौडबंगाल?

पिंपरी चिंचवड़ महापालिकेच्या मोशीतील कचरा डेपोला आग लागण्याचे प्रकार सातत्याने घडतात. आग लागण्याचे कारण नैसर्गिक आहे की हेतुपुरस्सर आग लावण्याचा मानव निर्मित प्रयत्न होतात यासाठी द्विसदस्यीय समिती देखील गठीत केली गेली होती. 2018, 2019, 2022 अशा सलग तीन वर्ष कचरा डेपो मध्ये कचऱ्याला आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकारामुळे वायु प्रदूषणाचा मोठा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. आता पुन्हा कचरा डेपोत उघड्यावर कचरा टाकल्यामुळे आग लागण्याचा प्रकार समोर आला आहे. प्रशासन याबाबत ठेकेदारांनी विरोधात कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मोशी कचरा डेपो मध्ये मंगळवारी कचऱ्याला लागलेली आग ही उन्हामुळे लागली आहे. याबाबत ठेकेदाराची चूक आहे का याची चौकशी केली जाईल. आग लागलेल्या कचऱ्यावर माती टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

संजय कुलकर्णी
मुख्य अभियंता, पर्यावरण विभाग

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button