IPL 2026 : आरसीबी विरुद्ध गुजरात महामुकाबल्यावर पावसाचे सावट; सामना रद्द झाल्यास ‘या’ संघाला मिळणार फायनलचे तिकीट

RCB vs GT Qualifier | आयपीएल २०२६ च्या प्लेऑफ सामन्यांना आज म्हणजेच २६ मे पासून सुरुवात होत आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) हे तगडे संघ आमनेसामने येणार आहेत. साखळी फेरीअखेर गुणतालिकेत हे दोन्ही संघ अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी राहिल्यामुळे हा सामना अत्यंत अटीतटीचा होण्याची अपेक्षा आहे. मात्र, क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच या सामन्यावर पावसाचे मोठे सावट निर्माण झाले आहे.
हा महत्त्वाचा सामना धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. परंतु, हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज धरमशालामध्ये पावसाची ५० टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे सामन्यापूर्वी म्हणजेच दिवसभर या भागात पावसाची हजेरी असण्याची दाट शक्यता आहे.
सामन्यात होऊ शकतो विलंब; षटकं कमी होण्याची शक्यता
अॅक्युवेदरच्या अहवालानुसार, प्रत्यक्ष सामन्याच्या वेळेत पाऊस पडण्याचा अंदाज नसला तरी, सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सतत पाऊस पडण्याची ५० टक्क्यांहून अधिक शक्यता आहे. धरमशाला हा बर्फाच्छादित पर्वतांनी वेढलेला डोंगराळ प्रदेश असल्याने येथील हवामान कधीही बदलू शकते. दिवसभर पाऊस सुरू राहिल्यास मैदान ओले होऊन सामना उशिरा सुरू होऊ शकतो, तसेच सामन्यातील षटकांची संख्या (Overs) कमी केली जाण्याचीही शक्यता आहे. या सामन्याची नाणेफेक सायंकाळी ७:०० वाजता होणार असून, सामना ७:३० वाजता सुरू होईल.
हेही वाचा
सामना रद्द झाला तर कोण मारणार बाजी?
आयपीएलच्या नियमांनुसार, प्लेऑफमधील ‘क्वालिफायर १’, ‘एलिमिनेटर’ आणि ‘क्वालिफायर २’ या सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस (Reserve Day) ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे पाऊस न थांबल्यास आणि सामना रद्द करण्याची वेळ आल्यास खालील नियमांनुसार निर्णय घेतला जाईल:
आरसीबी थेट अंतिम फेरीत पोहोचणार
जर पावसामुळे सामना पूर्णपणे रद्द झाला, तर आयपीएलच्या नियमानुसार गुणतालिकेत वरच्या स्थानावर असलेला संघ थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतो. साखळी फेरीत आरसीबीचा नेट रनरेट गुजरातपेक्षा सरस असल्याने ते पहिल्या स्थानावर आहेत. त्यामुळे सामना रद्द झाल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू थेट फायनल गाठेल.
गुजरात टायटन्सला खेळावा लागेल ‘क्वालिफायर २’
सामना रद्द झाल्यामुळे आरसीबीला अंतिम फेरीचे तिकीट मिळाले, तरी गुजरात टायटन्सचे आव्हान संपणार नाही. गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असल्याचा फायदा गुजरातला मिळेल आणि त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी ‘क्वालिफायर २’ च्या माध्यमातून आणखी एक संधी उपलब्ध असेल. या सामन्यात त्यांचा सामना ‘एलिमिनेटर’ सामन्यातील विजेत्या संघाशी होईल.





