ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्वागतम ई-प्रवेश प्रणालीला नागरिकांचा मिळतोय प्रतिसाद

सुमारे ७ हजार ८९४ जणांनी घेतला लाभ

पिंपरी | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेची बचत करणारी सेवा देण्यासाठी दि. १ मे २०२६ पासून महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत प्रवेशासाठी ‘स्वागतम ई-प्रवेश’ ही ऑनलाइन नोंदणी प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून १ मे २०२६ ते २५ मे २०२६ (सायंकाळी ४ वाजेपर्यंत) या कालावधीत सुमारे ७ हजार ८९४ नागरिकांनी या प्रणालीचा लाभ घेतला आहे.

स्वागतम ई-प्रवेश प्रणालीअंतर्गत नागरिकांना महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in वर जाऊन ‘मुख्य इमारत प्रवेश प्रणाली’ या लिंकद्वारे आपली नोंदणी करणे सहज शक्य होत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना कमीत कमी वेळेत, सुरक्षित आणि सुलभ पद्धतीने महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीत प्रवेश मिळवून देणे तसेच प्रत्येक प्रवेशाची अचूक नोंद महापालिकेकडे ठेवणे हा आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असून नागरिकांनी या नव्या डिजिटल सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

अशी करा नोंदणी

प्रथमच नोंदणी करणाऱ्या नागरिकांनी आपले लॉगिन अकाऊंट तयार करणे आवश्यक असून त्यामध्ये पूर्ण नाव, राहण्याचा पत्ता, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक यांची माहिती नोंदवावी लागेल.

लॉगिन अकाऊंट तयार करण्याची प्रक्रिया केवळ एकदाच करावी लागेल. त्यानंतर नागरिकांना प्रत्येक वेळी थेट लॉगिन करून प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे.

हेही वाचा

IPL 2026 : आरसीबी विरुद्ध गुजरात महामुकाबल्यावर पावसाचे सावट; सामना रद्द झाल्यास ‘या’ संघाला मिळणार फायनलचे तिकीट

नोंदणीदरम्यान नागरिकांच्या मोबाईल क्रमांकाची ओटीपीद्वारे पडताळणी केली जाणार असून प्रत्येक प्रवेशाच्या वेळीही ओटीपी प्रणाली लागू करण्यात आलेली आहे.

प्रवेश नोंदणी करताना नागरिकांनी किमान १ आणि कमाल ३ विभागांना भेट देण्याची माहिती नमूद करणे आवश्यक आहे.

नागरिकांना नोंदणी करताना ते ज्या दिवशी नोंदणी करीत आहेत, त्या दिवसापासून पुढील ७ दिवसांपर्यंत (शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्ट्या वगळता) उपलब्ध तारखा दिसतील. त्यानुसार इच्छित दिनांक व संबंधित विभाग निवडून नोंदणी करता येईल.

नोंदणी पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर क्युआर कोड डाउनलोड करता येईल. हा क्युआर कोड महापालिका मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर दाखविल्यानंतर तो स्कॅन करून प्रवेश सुनिश्चित होणार आहे.

जर नोंदणीच्या वेळी क्युआर कोड डाउनलोड केला गेला नसला, तरी नागरिक त्यांच्या लॉगिन अकाऊंटवरून तो कधीही डाउनलोड करू शकतात. तसेच आगाऊ तारखेसाठी नोंदणी केल्यास क्युआर कोड डाउनलोड करण्याची सुविधा संबंधित प्रवेशाच्या दिवशी उपलब्ध होईल.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिककेंद्री आणि तंत्रज्ञानाधारित प्रशासनाच्या दिशेने सातत्याने वाटचाल करत आहे. ‘स्वागतम ई-प्रवेश’ प्रणालीमुळे नागरिकांना महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीत प्रवेशासाठी पूर्वनोंदणीची सुलभ सुविधा उपलब्ध झाली असून वेळेची बचत, पारदर्शकता आणि सुरक्षितता सुनिश्चित होत आहे. नागरिकांकडून या उपक्रमाला मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद समाधानकारक असून अधिकाधिक नागरिकांनी या डिजिटल सुविधेचा लाभ घ्यावा.

– डॉ.विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button