निगडीपर्यंत मेट्रोमुळे वाढणार कनेक्टिव्हिटी!

पिंपरी : पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी (पीसीएमसी) मार्गिकेचा निगडीतील भक्तीशक्ती चौकापर्यंत विस्तार केला जाणार आहे. त्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे मुंबई-पुणे महामार्गाच्या परिसरातील चिंचवड, आकुर्डी, निगडी या गावांसह चिखली, तळवडे, संभाजीनगर, शाहूनगर, यमुनानगर, प्राधिकरण, रावेत, किवळे, मामुर्डी या गावांचीही कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पुणे मेट्रोच्या दोन मार्गांवर प्रवासी सेवा सुरू झाली आहे. स्वारगेट ते पिंपरी (पिंपरी-चिंचवड महापालिका भवन – पीसीएमसी) आणि पुण्यातील वनाज ते रामवाडी असे हे दोन मार्ग आहेत. या दोन्ही मार्गांवर प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे.
त्यामुळे पिंपरी, चिंचवड, भोसरी, पूर्णानगर, मोरवाडी, नेहरूनगर, संत तुकारामनगर, पिंपळे सौदागर, सांगवी, दापोडी, कासारवाडी, फुगेवाडी, काळेवाडी, जाधववाडी, मोशी आदी भागातील नागरिकांना पुण्यात जाणे सोयीचे झाले आहे. या भागांना जोडण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) मेट्रो स्थानकांशी जोडणारी बससेवा सुरू केली आहे.
हेही वाचा – महापालिकेसाठी शिवसेना मैदानात ; पक्षाच्या बैठकांना सुरूवात
काही जण स्वतःच्या दुचाकीने किंवा रिक्षाने मेट्रो स्थानकांपर्यंत येऊन पुढील प्रवास मेट्रोने करत आहेत. त्यामुळे शहरातील पिंपरी, संत तुकारामनगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी स्थानकांवर प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. कारण, पुणे न्यायालय स्थानकावर उतरून कोथरूड, कर्वेनगर, वनाज आणि पुणे स्टेशन, येरवडा, रामवाडी भागात जाणे सहज सोपे झाले आहे.
आता या स्वारगेट-पिंपरी मार्गिकेचा विस्तार निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत केला जाणार आहे. त्याचे काम सुरू झाले आहे. पुढील दोन वर्षात प्रवासी सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शहराच्या उर्वरित भागातील विशेषतः मुंबई-पुणे महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या गावांची कनेक्टिव्हिटी मेट्रोने वाढणार आहे. शिवाय, हे दोन्ही बाजूंची गावेही पीएमपीने मेट्रो स्थानकाशी जोडली जाणार आहेत.
शहराच्या उत्तरेकडील शेवटचे टोक म्हणजे किवळे व मामुर्डी ही गावे आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका भवनापासून (पिंपरी मेट्रो स्थानक) साधारण १२ ते १५ किलोमीटरवर ही गावे आहेत. ती आता किवळेतील मुकाई चौकापासून पिंपरी मेट्रो स्थानकाशी पीएमपीने जोडली गेली आहेत. अर्थात पिंपरी मेट्रो स्थानक ते मुकाई चौक किवळे अशी बससेवा पीएमपीने सुरू केली आहे.





