महामार्गांवरील प्रवास आता अधिक सुरक्षित! ‘एमएसआरडीसी’ने राज्यभरात उचलले मोठे पाऊल

पुणे : राज्यातील महामार्ग आणि त्याभोवतीच्या सरकारी जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. अवैध इमारती आणि अनधिकृत जाहिरात फलकांमध्ये मोठी वाढ झाल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) राज्यभरात प्रमुख महामार्ग आणि त्याभोवतीच्या जागांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वेक्षणाद्वारे अतिक्रमणे शोधून ती हटविण्यात येणार असून, यामुळे वाहनचालकांचा महामार्गांवरील प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे प्रमुख महामार्गांबरोबरच त्यांच्या बाजूची गावे सोपविण्यात आली आहेत. त्यामुळे महामार्ग आणि त्याभोवतालच्या जागेतील बांधकामे आणि जाहिरात फलकांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यात अनधिकृत, विनापरवाना बांधकामे शोधण्यात येणार आहेत. तसेच, वैध बांधकामे परवानगीनुसार उभारण्यात आली आहेत का, याचीही तपासणी केली जाणार आहे. याचबरोबर महामार्गांभोवतालच्या जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यात अनधिकृत फलक शोधण्यात येणार आहेत. तसेच, वाहतुकीसह पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या जाहिरात फलकांची नोंद विशेषत्वाने केली जाणार आहे. महामार्गांभोवतीची बांधकामे आणि जाहिरात फलकांचा ‘जीआयएस’ आधारित विदासंच तयार केला जाणार आहे. त्यातून भविष्यात ही बांधकामे आणि जाहिरात फलकांवर देखरेख ठेवणे शक्य होणार आहे.
हेही वाचा – RBI च्या आदेशामुळे लोकांना दिलासा, डिजिटल फ्रॉडसाठी आता नवीन नियम जारी, पाच दिवसांच्या आत…
महामार्गाभोवती असलेली अवैध बांधकामे आणि जाहिरात फलकांचा सर्व तपशील डिजिटल स्वरूपात जमा केला जाणार आहे. त्यात बांधकामाचे ठिकाण, त्याचा जीपीएस पत्ता, मालकी, बांधकाम प्रकार, आकार आणि त्याची छायाचित्रे यांचा समावेश असेल. याचबरोबर वैध बांधकामे आणि जाहिरात फलकांमुळे सुरक्षात्मक धोका होत आहे का, याचीही तपासणी केली जाईल. त्यात ही बांधकामे अथवा जाहिरातफलक पावसाळी नाले, रस्ते, पदपथ यावर आहेत का, याची नोंद घेतली जाईल. याचबरोबर वैध बांधकामे आणि जाहिरात फलकांबाबतची खातरजमा स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत केली जाईल. हे प्राथमिक सर्वेक्षण ९० दिवसांत पूर्ण होणार आहे. त्यानंतर अंतरिम व अंतिम अहवाल सादर होईल. याचबरोबर मासिक पातळीवर यापुढील काळात हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे, अशी माहिती महामंडळातील सूत्रांनी दिली.
राज्यात सर्वेक्षण कुठे?
- मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि त्याभोवतीची गावे
- नवीन महाबळेश्वरमधील ५२९ गावे
- राधानगरीतील ८४ गावे
- प्रस्तावित कोकण द्रुतगती मार्गाभोवतीची गावे
- पुणे बाह्य वर्तुळाकार मार्गाभोवतीची गावे
- समृद्धी महामार्गाभोवतीची गावे
- प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाभोवतीची गावे
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या हद्दीत अनेक ठिकाणी अतिक्रमण करून बांधकामे केली जातात अथवा जाहिरात फलक उभारण्यात येतात. ही अतिक्रमणे शोधून ती हटविण्यासाठी सर्वेक्षणाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या कामासाठी निविदा काढण्यात आली आहे.
– विनोद बोंद्रे, सरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ





