HMPV व्हायरसमुळे नेमकं कुठे इन्फेक्शन होतं, उपचार कसे करायचे? पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी नीना बोराडे यांची महत्वाची माहिती

पुणे : जगात थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर आता पुन्हा एकदा अनेक देश धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडले आहे. ह्युमन मेटाप्युमोव्हायरस या चीनमधील नव्या व्हायरसमुळे पुन्हा देशांची डोकेदुखी वाढली आहे. सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून आले होते. आता नागपुरातही एचएमपीव्हीची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. दोन लहान मुलांचा HMPV अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सात वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला HMPV ची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य विभागसह सर्व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आल्याचे चित्र आहे. पुण्यात प्रशासन अलर्ट मोडवरती आलं आहे. दरम्यान हा व्हायरस धोकादायक नाही, त्याचबरोबर याच्या उपचार पद्धती माहिती आहे, घाबरू नका. सावध रहा, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी नीना बोराडे यांनी दिली आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी नीना बोराडे यांनी माहिती देताना सांगितलं की, हा व्हायरस नवीन नाही. उपचार पद्धती माहिती आहे. इतर व्हायरस प्रमाणे हा व्हायरस आहे. कोरोनासारखा नाही. श्वसन संथेच्या वरच्या भागाला इजा करतो. लहान मूलं आणि ज्येष्ठांमध्ये जास्त प्रमाणात आढळू शकतो. त्यांच्या फुफुसांपर्यंत हा व्हायरस जाऊ शकतो. मात्र बाकी वयोगटातील नागरिकांमध्ये श्वसन संस्थेच्या वरचा भागात इन्फेक्शन होतं. घाबरू नका. सावध रहा. सर्दी खोकला झाल्यावर जी काळजी घेतो तशीच काळजी घ्या. गर्दीच्या ठिकाणी खबरदारी म्हणून मास्क वापरा. रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी तसा आहार घ्या. नायडू हॉस्पिटलमध्ये 350 बेड तयार आहेत. शासनाच्या सूचनेनुसार काम करत आहोत. व्हायरस संदर्भात सगळी माहिती पुण्यातील प्रत्येक रुग्णालयापर्यंत पोहोचवली आहे. सर्दी खोकला संदर्भात सर्वेक्षण सुरू आहे, अशी माहिती देखील बोराडे यांनी दिली आहे.
हेही वाचा – निगडीपर्यंत मेट्रोमुळे वाढणार कनेक्टिव्हिटी!
काय करावं?
* खोकताना किंवा शिंकताना आपलं तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा.
* साबण, पाणी किंवा अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझरनं आपले हात वारंवार धुवावेत.
* ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
* भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.
* संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी व्हेंटीलेशन होईल, याची दक्षता घ्या.
काय करणं टाळावं?
* खोकलेल्या किंवा शिंकलेल्या हातांनी हस्तांदोलन करणं टाळावं. यामुळे संसर्ग लगेच पसरतो.
* टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर तो कचरा पेटीत टाकावा. वारंवार एकाच टिश्यू पेपरचा वापर करणं टाळावं.
* आजारी लोकांपासून लांब राहावं. व्हायरल इन्फेक्शन झालेलं असल्यास शक्यतो रुग्णाच्या जवळ जाऊ नये. शक्य असल्यास त्याला घरातच आयसोलेट करावं.
* डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये.





