breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

‘ब्लॅक स्पॉट’वर तात्पुरती मलमपट्टी! – शहरातील अपघातांचे सत्र सुरूच

पुणे : शहरातील २३ ठिकाणांवर साक्षात यमराज दबा धरून बसला आहे. महापालिकेच्या उदासीन कारभारामुळे काही ठराविक ठिकाणांवर (‘ब्लॅक स्पॉट’) वारंवार अपघात घडत आहेत. त्यांची जंत्री पुणे पोलिसांनी तयार केली असून त्याठिकाणी झालेल्या गंभीर अपघातांच्या संख्येसह ही यादी महापालिकेला पाठविण्यात आली आहे. याठिकाणी उपाययोजना करून अपघात, वाहतूक कोंडी निर्मूलनासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत. मात्र पालिकेच्या पथ विभागाने ‘ब्लॅक स्पॉट’वर कायम स्वरुपी उपाय योजना करण्याऐवजी केवळ तात्पुरती मलमपट्टी करत रंगोरंगोटीची कामे केली आहेत. त्यानंतर अपघात कमी होणे अपेक्षित होते, मात्र अपघातांची मालिका सुरुच असून अनेकांना जीव गमवावा लागत आहे.

महापालिका हद्दीत २३ ठिकाणी तर जिल्ह्यात ३९ ठिकाणी वांरवार अपघात होत आहेत. त्यामुळे यावर कायमस्वरुपी उपाय योजना करण्यासाठी पोलिसांनी यादी दिली होती. त्यानंतर पालिकेच्या पथ विभागाने सर्व्हेक्षण केले आहे. त्यातून तात्पुरते उपाय आणि कायमस्वरुपी उपाय ठरविले आहेत. तात्पुरत्या उपाय योजनांमध्ये रंगरंगोटी, साईड पट्टे मारणे, दिशा दर्शक फलक बसविणे, धोकादायक ठिकाणांची माहिती सांगणे अशी कामे ठरविली होती.  ही कामे पूर्ण केली आहेत. परंतु पोलिसांच्या सूचनेनुसार कायमस्वरुपी उपाय योजना करण्यासाठी नियोजन केलेले नाही. कायमस्वरुपी उपायासाठी वाहनांची वर्दळ, कोणत्या वेळेला गर्दी, वाहतुकीचे स्वरुप आदी बाबींचा अभ्यास पथ विभाग करत आहे. त्यानंतर कायम स्वरुपी उपाय केले जाणार आहेत. तसेच ब्लॅक स्पॉट बंद करण्याचे कामे सुरु होईल. त्याची निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम सुरु आहे, असे पथ विभागाने सांगितले.

हेही वाचा –  भामा आसखेड धरणात फक्त 17.51% पाणीसाठा!

मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले पूलाजवळ सर्वाधिक अपघात घडले आहेत. त्या खालोखाल लोणी काळभोर आणि विमानतळ परिसराचा समावेश आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०२० ते २०२३ या काळातील अपघातांचा तुलनात्मक अभ्यास केला आहे. संबंधित ‘ब्लॅक स्पॉट’च्या ५०० मीटर क्षेत्रामध्ये मागील तीन वर्षात घडलेल्या प्राणांतिक अपघातांची आकडेवारी काढण्यात आली आहे. या काळात सलग पाच प्राणांतिक अपघात किंवा गंभीर अपघात घडलेले असतील, तसेच एकूण १० व्यक्ती (एका पेक्षा अधिक अपघात मिळून) मृत्यूमुखी पडलेल्या असतील अशा ठिकाणांची यादी तयार करण्यात आली आहे. यादीमध्ये भारती विद्यापीठ, कात्रज चौक, भारती विद्यापीठ,  दरी पुल, भारती विद्यापीठ, नविन कात्रज बोगदा, वारजे माळवाडी-माई मंगेशकर हॉस्पीटल, वारजे माळवाडी-  मुठा नदी पुल, वारजे माळवाडी – डुक्कर खिंड, सिंहगड रोड- नवले पुल, सिंहगड रोड – सेल्फी पॉईट, हडपसर – आयबीएम कंपनी, हडपसर – रविदर्शन चौक, लोणी काळभोर -कदमवाक वस्ती, लोणी काळभोर – लोणी स्टेशन चौक, लोणी काळभोर – थेऊर फाटा चौक, लोणी काळभोर – पालखी विसावा वडकी, चंदननगर – खराडी बायपास चौक, चंदननगर – रिलायंस मार्ट, विमानतळ – खराडी जकात नाका,  विमानतळ – टाटा गार्डरुम चौक, विमानतळ – विमाननगर चौक, विमानतळ – ५०९ चौक, मुंढवा – मुंढवा रेल्वे पूल या ठिकाणांचा समावेश आहे.

अपघातप्रवण म्हणून निष्पन्न झालेल्या २३ ठिकाणांची नव्याने निश्चिती केली आहे. ही यादी वाहतुक पोलीस शाखेकडून महापालिकेला पाठविली आहे. या  ब्लॅकस्पॉटची पाहणी करून आवश्यक तेथे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास पोलिसांनी पालिकेला कळविले होते. तसेच केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा अहवाल वाहतूक शाखेला पाठवावा असेही पत्रामध्ये नमूद केले होते. त्यानुसार पथ विभाग कायमस्वरुपी उपाय योजना लवकरच करणार आहे.

स्वारगेट चौकातील सारसबागकडे जाणाऱ्या ग्रेड सेपरेटरवर एका दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत एका ३४ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट (सीए) चा जागीच मृत्यू झाला. स्वारगेट पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सागर सुरेश मंत्री असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी नयन सतिश भनसाळी (वय २७, रा. कसबा पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

अपघातानंतर पुणे शहर कॉंग्रेसने संताप व्यक्त केला असून अपघातप्रवण ठिकाणांवर उपाय योजना करण्याची मागणी केली आहे. अपघाताच्या ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तसेच वाहतूक पोलिसांनी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे यांनी केली होती. त्यानुसार पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी रस्त्यावर जड वाहने उभी असल्याचे दिसून आले. या ठिकाणी वाहनांचा अपघात होऊ नयेत, यासाठी उपाय योजना केल्या जाणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button