#CoronaVirus: दक्षिण कोरियात पुन्हा रुग्ण, पण एकूण वाढ कमी

बँकॉक : दक्षिण कोरियात काही जणांना पुन्हा संसर्ग होण्याच्या घटना सामोऱ्या आल्या असल्या, तरी रुग्णसंख्येतील वाढ कमी आहे रविवारी तेथे आठ नवीन रुग्ण सापडले असून जपानमध्ये दोन महिन्यात प्रथमच रोजची रुग्णसंख्या वाढ एक अंकी झाली आहे. कोरिया सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने म्हटले आहे की, दक्षिण कोरियात आतापर्यंत २३४ बळी गेले असून एकूण १०,६६१ जणांना संसर्ग झाला आहे. एकूण ८०४२ जण बरे झाले असून त्यांना विलगीकरणातून सोडून देण्यात आले आहे. १२,२४३ जणांवर चाचण्या करण्यात आल्या असून त्यांचे निकाल बाकी आहेत.
अध्यक्ष मून जे इन यांनी सांगितले की, शेवटचा निश्चित रुग्ण बरा होईपर्यंत निर्बंध कमी करता येणार नाहीत. फेब्रुवारीचा उत्तरार्ध ते मार्चची सुरुवात या काळात दक्षिण कोरियात जास्त रुग्ण सापडले होते. त्यात दाएगू हे करोनाचे मुख्य केंद्र ठरले होते. दक्षिण कोरियात त्यानंतर काही काळ संसर्गाचे प्रमाण कमी झाले होते नंतर सामाजिक अंतराचा निकष न पाळल्याने रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली होती. अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन व लोकांच्या नोक ऱ्या वाचवणे याला आमचे प्राधान्य असल्याचे मून यांनी म्हटले आहे. दरम्यान, जपानमध्ये काही जणांना पुन्हा संसर्ग झाल्याची माहिती हाती येत असून तेथे बऱ्याच प्रमाणात निर्बंध शिथिल करून मर्यादित प्रमाणात व्यवहार सुरू करण्यात आले आहेत.





