मोफत आरोग्य तपासणी शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य जनजागृती
एसपीजी पब्लिक स्कूलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वेधले लक्ष
पिंपरी-चिंचवड : राष्ट्रीय डॉक्टर्स डेच्या निमित्ताने भोसरी येथील एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आरोग्य जनजागृतीपर कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी डॉक्टरांच्या कार्याला मानवंदना देत आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारे विविध कार्यक्रम सादर केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे डॉ. रवींद्र पांडुरंग जांगळे (बीडीएस), डेंटल केअर अँड इम्प्लांट सेंटर, तसेच स्वप्नील पांडुरंग गावळी, कोमल स्वप्नील गावळी, सुप्रिया मुळे आणि पल्लवी पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी डॉक्टरांच्या समाजातील योगदानावर आधारित भाषणे, कविता, नृत्य, नाटिका आणि आरोग्य, स्वच्छता तसेच निरोगी जीवनशैलीवर आधारित सादरीकरणे केली. वर्गखोल्या, सॉफ्ट बोर्ड, रांगोळी आणि संपूर्ण शाळा परिसर आरोग्य जनजागृतीपर संदेशांनी सजविण्यात आला होता.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैली, वैयक्तिक स्वच्छता आणि दंत आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. समारोपप्रसंगी एकता जाधव, तैसीन मुलाणी आणि पल्लवी पवार यांनी मान्यवर, शाळा व्यवस्थापन, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांचे आभार मानले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय व्यवसायाविषयी आदराची भावना अधिक दृढ झाली असून आरोग्य, स्वच्छता आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले.
“एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास जितका महत्त्वाचा आहे, तितकाच त्यांच्या आरोग्यदायी आणि सुसंस्कृत जीवनशैलीचा विकासही आमच्यासाठी प्राधान्याचा विषय आहे. राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त आयोजित उपक्रमातून विद्यार्थ्यांना डॉक्टरांच्या कार्याचा परिचय, आरोग्याबाबत जागरूकता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव झाली. अशा उपक्रमांमधून निरोगी, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक घडविण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील.”
– प्रवीण गायकवाड, प्राचार्य.






