भाजपाच्या कार्यालयाची अज्ञातांकडून तोडफोड, सीसीटीव्ही देखील तोडून टाकले
भाजपाच्या राज्यात भाजपाचे पदाधिकारीच सुरक्षित नसल्याचे उघडकीस

मुंबई : भाजपाच्या कार्यालयाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. भाजपाचे सरकार असताना कार्यालयाची अशा प्रकारे थोडफोड झाल्याने सामान्य कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. या प्रकरणात खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.भाजपाच्या सत्ताकाळातच पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कल्याण पश्चिम येथील वसंत व्हॅली परिसरातील भाजपाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही तोडफोड अज्ञात व्यक्तींकडून झाल्याचे उघडकीस आले आहे.ही तोडफोडीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. भाजप वाहतूक आघाडी कल्याण अध्यक्ष कृष्णा कारभारी यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. विकासकांकडून जागा बळकवण्यासाठी 30 ते 40 जणांच्या टोळीने येऊन तोडफोड केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी शैलेश जैन आणि रितेश किमतानी यांच्यासह किमान २५ जणांविरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा – हिंजवडी आयटी पार्कसह उद्योग क्षेत्राच्या वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पाऊल
“माझा जीव आणि जागा दोन्ही धोक्यात”
आपला जीव आणि जागा ही धोक्यात असल्याचे भाजप वाहतूक आघाडी कल्याण अध्यक्ष कृष्णा कारभारी यांनी म्हटले आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी याप्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी धावा केला आहे. ही तोडफोडीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.यात सीसीटीव्ही कॅमेरे फोडून कार्यालयात जबरदस्तीने घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचे दिसत आहे. या प्रकरणात खडकपाडा पोलिस अधिक तपास करीत आहेत. यापूर्वी देखील यांच्या जागेत घुसखोरीचा प्रयत्न झाला होता असे म्हटले जात आहे. या प्रकरणात तुम्ही अनधिकृतपणे कशी काय घुसखोरी करु शकता, तुमच्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे का असा सवाल भाजप वाहतूक आघाडी कल्याण अध्यक्ष कृष्णा कारभारी यांनी केला आहे.