Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

हिंजवडी आयटी पार्कसह उद्योग क्षेत्राच्या वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पाऊल

पुणे : हिंजवडी आयटी पार्कसह पुण्यातील विविध एमआयडीसीमध्ये वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. वाढते नागरीकरण आणि उद्योगांचा विस्तार होऊनही पायाभूत सुविधा न वाढल्यामुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अखेर ही समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक पाऊल पडले आहे.

हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील वाहतूक कोंडीची समस्या कायम चर्चेत असते. याचबरोबर पुण्यातील विविध औद्योगिक क्षेत्रांमधील (एमआयडीसी) वाहतुकीची समस्याही वारंवार प्रकर्षाने समोर येते. आयटी पार्कसह औद्योगिक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दररोज सरासरी एक तास वाहतूककोंडीत वाया जातो. कर्मचाऱ्यांचा एक तास अनुत्पादक जातो ही एकमेव बाब नसून, त्याचे अनेक गंभीर परिणाम उद्योगांवर होत आहेत. उद्योगांना कच्च्या मालाचा पुरवठा होण्यास आणि त्यांचे उत्पादन बाजारपेठेत पोहोचण्यास विलंब या गोष्टींचाही फटका उद्योगांना बसत आहे. यामुळे एकूण उद्योगांच्या अर्थकारणालाच झळ बसविणारी ही कोंडी सोडविण्यासाठी आता पावले उचलली जात आहेत.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी औद्योगिक क्षेत्रांना राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांशी जोडण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यात हिंजवडी आयटी पार्क, रांजणगाव औद्योगिक क्षेत्र आणि पिरंगुट औद्योगिक क्षेत्राचा समावेश आहे. या तिन्ही औद्योगिक क्षेत्रांमध्ये महामार्गांशी थेट जोडणारे विविध रस्ते प्रस्तावित केले आहेत.

हेही वाचा –  अधिकाऱ्यांच्या शिफारसींमुळेच निधी, महापालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण!

रांजणगाव औद्योगिक क्षेत्रात पिंपरी दुमाला राज्य मार्ग ते ढोकसांगवी ते शिरूर ग्रामीण राज्य मार्गाला जोडणाऱ्या प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्याची सुधारणा केली जाणार आहे. या रस्त्याची लांबी १२ किलोमीटर असून, त्यासाठी १९.९० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुणे-शिरूर राष्ट्रीय महामार्गापासून ढोकसांगवी ते निमगाव भोगी ते मलठण राज्य मार्गाला जोडणारा प्रमुख जिल्हा मार्ग बांधण्यात येणार आहे. या रस्त्याची लांबी १० किलोमीटर असून, यासाठी १८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. अहमदाबाद राज्य मार्ग ते निमगाव भोगी ते सोनेसांगवी राज्य मार्ग ते प्रमुख जिल्हा मार्ग बांधण्यात येईल. या रस्त्याची लांबी ९ किलोमीटर असून, १८ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. शिरूर तालुक्यातील करडे ते निमोणे या प्रमुख जिल्हा मार्गाचे काम करण्यात येणार आहे. हा मार्ग ९ किलोमीटरचा असून, त्यासाठी १२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

हिंजवडी आयटी पार्कमध्ये म्हाळुंगे ते हिंजवडी पहिला टप्पा १ मधील रस्ता विकसित केला जाणार आहे. हा रस्ता दीड किलोमीटरचा असून, तो ३६ मीटर रुंदीचा असेल. यासाठी १३ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. आयटी पार्कमध्ये ठाकर वस्ती ते माण गावठाण रस्ता विकसित केला जाणार आहे. हा रस्ता २.४० किलोमीटरचा असेल आणि यासाठी २० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याचबरोबर सूर्या हॉस्पिटल ते ठाकर वस्तीला जोडणारा रस्ता बांधला जाणार आहे. हा रस्ता ३.५ किलोमीटरचा असून, त्याला ३० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे.

पिरंगुट औद्योगिक क्षेत्रात उरवडे ते हिंजवडी टप्पा ३ रस्ता विकसित केला जाणार आहे. हा रस्ता ७.१० किलोमीटरचा असून, त्यासाठी ४५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. नांदे ते लवळे हा ३.९३ किलोमीटरचा विकसित केला जाणार असून, त्यासाठी ४५ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. नांदे ते माण हा नवीन रस्ता बांधला जाणार असून, तो १.५ किलोमीटरचा आहे. या रस्त्यासाठी ३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. अशा प्रकारे हिंजवडी आयटी पार्क, रांजगाव औद्योगिक क्षेत्र आणि पिरंगुट औद्योगिक क्षेत्रात एकूण ५९.९३ किलोमीटरचे रस्ते बांधले जाणार आहेत. यासाठी एकूण २०३ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. पीएमआरडीएने उचललेल्या या पावलामुळे आगामी काळात उद्योगांची वाहतूककोंडीतून सुटका होण्याची आशा आहे. मात्र, हे प्रकल्प वेळेत पूर्णत्वास नेण्याचे आव्हान पीएमआरडीएने पूर्ण केले, तरच खऱ्या अर्थाने उद्योगांची कोंडी सुटेल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button