चांदणी चौक कोंडीमुक्त होणार! नितीन गडकरींच्या हस्ते होणार उद्घाटन

पुणे : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका होण्यास मदत होणार आहे. अनेक वर्षे या त्रासलेल्या नागरिकांना ट्रॅफिक मधून सुटका मिळणार आहे. चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा फटका गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बसला. त्यानंतर येथील कामाला गती आली.
चांदणी चौकातील उड्डाणपुलासह रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. १२ ऑगस्टला (शनिवारी) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या चौकातील मार्गाचे लोकार्पण होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत.
यापूर्वी या कामाला १ मे, १५ जुलै असा मुहूर्त मिळाला होता. या चौकातील कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते. मात्र, काही काम झाल्यानंतर रस्त्याच्या भूसंपादनासाठी महापालिकेला अनेक अडथळे आले. त्यामुळे हे काम रखडले. त्यानंतर या चौकात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना येथील कोंडीत अडकावे लागले.
हेही वाचा – भररस्त्यात पत्रकाराला मारहाण; शिंदे गटातील आमदारानं दिलेली धमकी
यानंतर एकनाथ शिंदे यांनी यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हा प्रशासन तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले. त्यानंतर भूसंपादनासह या चौकातील जुना उड्डाणपूल पाडण्याबाबतच्या अडचणी निर्माण झाल्या. त्यावर यशस्वीपणे मात करत हे काम पूर्ण झाले. पालिकेला भूसंपादनासाठी सुमारे ४०० कोटी तसेच प्रत्यक्षात उड्डाणपूल उभारण्यासह अन्य रस्त्यांची कामे करण्यासाठी ४६० कोटी असे सुमारे ८६० कोटी रुपयांचा खर्च या कामासाठी आला आहे. गडकरी यांनी यापूर्वी याचे उद्घाटन १ मे रोजी होईल, असे जाहीर केले होते. मात्र, तो मुहूर्त हुकल्यानंतर १५ जुलै हा दिवस जाहीर केला.
मात्र काम अपूर्ण असल्याने गडकरी यांनी पुण्यात याबाबत आढावा बैठक घेऊन ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अखेर हे काम अंतिम टप्प्यात आले असून, फलक लावण्याबरोबर रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाईची कामे सुरू आहेत. दोन दिवसांत ही कामे पूर्ण करून उद्घाटनानंतर उड्डाणपुलासह सेवा रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल, असे एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.





