Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना सहकार्य’; जयंत पाटील

सांगली : उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर शेतकऱ्यांनी करावा, यासाठी राजारामबापू साखर कारखाना सहकार्य करेल असे प्रतिपादन माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी केले.

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर राजारामबापू साखर कारखाना, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्या वतीने आयोजित शेतकरी चर्चासत्रात ते बोलत होते. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील, शास्त्रज्ञ डॉ.अशोक कडलग, डॉ. विवेक भोईटे, ओंकार ढोबळे, ऊस विकास समितीचे अध्यक्ष अमरसिंह साळुंखे, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली आदी यावेळी उपस्थित होते.

आ. जयंत पाटील म्हणाले,बारामती येथे एआय तंत्रज्ञानाचा ऊस शेतीत वापर करून एकरी उत्पादन वाढते,हे सिद्ध झाले आहे. गेल्या पाच वर्षापासून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सहकार्याने काम सुरू आहे. येत्या २५ तारखेपर्यंत व्हीएसआय व केव्हीके यांच्यात करार केला जाईल. त्यानंतर आपला कारखाना करार करेल. आपल्या कारखान्याच्या ऊस विकास विभागातील अधिकारी-कर्मचारी आपणास मार्गदर्शन करतील आणि कारखाना आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहील. आपण या उपक्रमात सहभागी व्हावे. पुढच्या टप्प्यात १०-१५ हजार शेतकऱ्यांना सहभागी करून घेऊ.

हेही वाचा –  हवामान बदलांचा सामना करण्यासाठी महापालिका आंतरराष्ट्रीय करारात सहभागी

डॉ. कडलग म्हणाले, की सध्या शेती करताना शेतकऱ्यांच्यासमोर अनेक आव्हाने, अडचणी उभा आहेत. ही आव्हाने,अडचणी कमी करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. आपल्या परिसरात क्षारपड जमिनीचा मोठा प्रश्न आहे. क्षारपड जमिनीत ही एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऊस शेतीत उत्पादन वाढ करू शकतो.

डॉ. भोईटे म्हणाले, की एआय तंत्रज्ञानात सॅटेलाईट, वेदर स्टेशन व सेन्सॉर यंत्रणेतून शेतकऱ्यांना मराठीतून अचूक माहिती दिली जाते. त्यातून पाणी, खत आणि किडींचे अचूक व्यवस्थापन केल्याने उत्पादनात निश्चितपणे वाढ होत आहे. सध्या तामिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश,उत्तर प्रदेश राज्यातील शेतकरी आमच्या बरोबर या तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. यावेळी त्यांनी एआय तंत्रज्ञानाची अगदी सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button