मुंबईत पावासाचा रेड अलर्ट, समुद्राला भरती; चार मीटरपर्यंत लाटा उसळणार

मुंबई : राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर सोमवारी सकाळपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी शहरात पाणी साचल्यामुळं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच, मुंबईला हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आज समुद्राला मोठी भरती येणार असून चार मीटरपर्यंत लाटा उंच उसळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळं नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आलं आहे.
माटुंगा, मस्जिद बंदर या रेल्वे स्थानकांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात साचलेले पाणी आता फलटाच्या उंचीच्या जवळपास पोहोचल्याने येथील काही भागात वाहतून ठप्प झाली आहे.
हेही वाचा – देशभरात पुन्हा करोनाचे सावट; महाराष्ट्रात २०९, तर दिल्लीत १०४ रुग्ण
दरम्यान, हवामान विभागाने मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील ४ तास मुसळधार पावासाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच काही जिल्ह्यांना अलर्ट जाहीर केला आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने मुंबई, नवी मुंबई शहर आणि रायगड जिल्ह्यााला रेड अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केलाय.
हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, तसेच सखल भागांमध्ये राहणाऱ्यांनी विशेष सावधगिरी बाळगावी. प्रशासन तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे. मात्र, नागरिकांनीदेखील सहकार्य करणे गरजेचे आहे. असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.