देशभरात पुन्हा करोनाचे सावट; महाराष्ट्रात २०९, तर दिल्लीत १०४ रुग्ण

Covid 19 Cases | देशभरात करोना विषाणूने (कोव्हिड-१९) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात सध्या १,००० हून अधिक सक्रिय करोनाबाधित रुग्ण आहेत. यापैकी ७५२ रुग्णांची नोंद गेल्या पाच ते सहा दिवसांत झाली आहे, ज्यामुळे आरोग्य यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.
सध्या केरळ राज्यात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण आढळले असून, एकूण ४३० सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात २०९, दिल्लीत १०४, उत्तर प्रदेशात १५, पश्चिम बंगालमध्ये १२, गुजरातमध्ये ८३ आणि कर्नाटकात ४७ सक्रिय रुग्ण आहेत. या आकडेवारीमुळे काही राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळली असून, बहुतेक रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. तथापि, नवीन ओमिक्रॉन उपप्रकार (उदा. XEC) आणि इतर प्रकारांच्या प्रसारामुळे चिंता वाढली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) या प्रकारांचा बारकाईने अभ्यास करत आहेत.
हेही वाचा : कुरापतखोर शेजाऱ्यांवर बळाचा वापर गरजेचा; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत
केंद्र सरकारने राज्यांना सतर्क राहण्याचे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कठोरपणे राबवण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे आणि लसीकरणाला गती देण्याचा समावेश आहे. कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले की, राज्यात जोखमीच्या रुग्णांची चाचणी आणि आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.
जागतिक स्तरावरही करोनाच्या नवीन प्रकारांमुळे काही देशांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. भारतात सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी (comorbidities) असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.