रेल्वे मंत्रालयाने भारतीय रेल्वे तिकिटांच्या किमती वाढवण्याचा निर्णय
'या' तारखेपासून रेल्वेच्या तिकीट दरात वाढ

महाराष्ट्र : देशभरातील कोट्यवधी रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वेने दीर्घ कालावधीनंतर तिकिटांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन दर 1 जुलै 2025 पासून लागू होणार आहेत. त्याचबरोबर तत्काळ तिकिट बुकिंगसाठी नवीन नियम जारी करण्यात आले आहेत. सर्वसामान्य प्रवाशांना फायदा व्हावा यासाठी हे निर्णय घेतले असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.
तिकीटाच्या दरात किती वाढ होणार?
रेल्वे मंत्रालयाने तिकिटांच्या किमतीत किंचित वाढ करण्याची घोषणा केली आहे. नॉन-एसी मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचे भाडे प्रति किलोमीटर 1 पैशाने वाढणार आहे, तर एसी क्लासमध्ये 2 पैसे प्रति किलोमीटर भाडे वाढणार आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासावर या भाडेवाढीचा परिणाम होणार आहे. जर एखादा प्रवासी मुंबई ते दिल्ली (1400 किमी) नॉन-एसी ट्रेनने प्रवास करत असेल तर त्याला 14 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. तर एसी क्लाससाठी 28 रुपये मोजावे लागणार आहेत.
हेही वाचा – माटे हायस्कूलमध्ये योग दिन उत्साहात साजरा
रेल्वे प्रशासनाने सेवा सुधारण्यासाठी हा बदल केला असल्याची माहिती दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे 500 किमी पर्यंत प्रवास करणाऱ्यांसाठी ही भाडेवाढ लागू असणार नाही. नवीन भाडेवाढ ही 500 किमी पेक्षा जास्त प्रवास करणाऱ्यांना लागू असणार आहे. दुय्यम श्रेणीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति किलोमीटरसाठी अर्धा पैसा अतिरिक्त द्यावा लागणार आहे.
तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधारकार्ड अनिवार्य
रेल्वेकडून तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. 1 जुलै 2025 पासून तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी आधार ऑथेंटिकेशन गरजेचे असणार आहे. रेल्वे मंत्रालयाने 10 जून रोजी एका आदेशाद्वारे सर्व रेल्वे झोनना याबाबत माहिती दिली आहे. यामुळे आता दलाल किंवा अनधिकृत एजंटला फटका बसणार आहे.
तत्काळ तिकीट फक्त IRCTC द्वारेच बुक करता येणार
इथून पुढे तत्काळ तिकिटे फक्त IRCTC च्या वेबसाइट किंवा अॅपद्वारे बुक करता येणार आहेत. तसेच 15 जुलै 2025 पासून तत्काळ तिकीट बुकिंग दरम्यान आधारकार्डच्या ओटीपीची पडताळणी केली जाणार आहे. म्हणजेच तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य असणार आहे.
तत्काळ बुकिंगसाठी एजंटवर बंदी
तत्काळ तिकीट बुकिंग करताना आता अनधिकृत एजंट्स तत्काळ विडो खुली झाल्यानंतर अर्धा तास तिकीट बुक करु शकणार नाहीत. सामान्य प्रवाशांना तत्काळ तिकिटे सहज बुक करता यावीत म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.