अजितदादांच्या खात्यावर ‘वॉच’ !
निधी वाटप आणि निधी वितरणावरून शिवसेनेचे आमदार खवळले, थेट अजितदादांवर आरोप !

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील ‘महायुती’ सरकारमधील दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली की काय, असे राजकीय चित्र उभे राहिले आहे. अजितदादांच्या अर्थ खात्यावर ‘वॉच’ ठेवण्याचे आदेश शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिले असल्याने आता रान चांगलेच पेटणार आहे.
अजितदादा बारामतीत तळ ठोकून..
दरम्यान, बारामती येथे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आणि तेथील मतमोजणी असल्यामुळे गेले काही दिवस अजित पवार हे बारामती तळ ठोकून आहेत. त्यांनी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधून आपली बाजू मांडली. जे काही वाद दिसत आहेत त्याबाबत आपण एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करू असे अजित दादा म्हणाले.
निधी नसल्याचा नेहमीचा आरोप!
मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीस आणि शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या मंत्र्यांनी निधी वाटपाचा मुद्दा उपस्थित केला. अजित पवार निधी देत नाहीत, असा नाराजीचा सूर लावलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांना एकनाथ शिंदे यांनी आता थेट आदेश दिले आहेत. अजित पवारांच्या खात्याकडे मोठा निधी आहे, त्यावर लक्ष ठेवा. तो निधी कुठे वितरित होतो, याची माहिती घ्या आणि मग आकडेवारीनिशी आपण बोलू या, असा आदेश एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांना दिल्याची माहिती आहे. कॅबिनेटच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची वेगळी बैठक घेतली. त्यामध्ये निधी वाटपावरुन शिंदेंच्या मंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे वृत्त आहे.
निधीवरून तिघांमध्ये धुसफूस..
‘महायुती’ सरकारच्या तीन घटक पक्षांमध्ये निधी वाटपासंबंधी सातत्याने धुसफूस सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यातही शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याविषयी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांची स्वतंत्र बैठक घेतली. राज्यामध्ये ‘महाविकास आघाडी’चे सरकार असताना अजित पवार हेच अर्थमंत्री होते आणि ते निधी वाटपामध्ये अन्याय करत असल्यामुळे त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदार फुटले होते. पण, पुन्हा अजित पवार हे ‘महायुती’ यामध्ये आल्यामुळे तीच परिस्थिती उद्भवली आहे.
एकनाथ शिंदे निधीवरुन आक्रमक
राज्यातील निधी वाटपावरुन एकनाथ शिंदे आक्रमक झाल्याचे दिसून आले. अजित पवारांच्या खात्यावर बारकाईने लक्ष ठेवा, असा आदेश त्यांनी मंत्र्यांना दिला आहे. अजित पवारांच्या खात्यात १४- १४ हजार कोटींचे दोन निधी आहेत. त्यावर लक्ष ठेवले पाहिजे. हा निधी कुठे वितरीत होत आहे, यांची माहिती आपल्याला मिळाली पाहिजे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा : मराठीवर हल्ले होत असताना नाना पाटेकर, माधुरी दीक्षित, प्रशांत दामले गप्प का? संजय राऊतांचा सवाल
हक्काचे मिळालेच पाहिजे..
जे आपल्या हक्काचे आहे, ते घेतलेच पाहिजे, असा आदेश एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना दिला आहे. त्यामुळे आता अजित पवारांच्या अर्थखात्यावर शिवसेनेचा ‘वॅाच’ असेल, अशी चर्चा सुरू आहे. राज्याच्या दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये अशी रस्सीखेच आणि मानापमान नाट्य चालू असल्याने तो एक चर्चेचा विषय झाला आहे.
शिंदे अजित पवारांच्या भेटीला ?
निधी वाटपाच्या मुद्द्यावरून मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांची भेट घेतली असल्याचे वृत्त आहे. त्या आधी शिंदेंचे मंत्री उदय सामंत यांनीही अजित पवारांची भेट घेऊन चर्चा केली होती. या भेटीमध्ये निधी वाटपावरुन चर्चा झाल्याची माहिती आहे. तथापि, या मुद्द्यावर दोघांमध्ये कोणतीही नाराजी नाही, असेही सांगण्यात येते.
निधी वाटपावरुन आधीही नाराजी..
अजित पवार आपल्याला निधी देत नाहीत, अशी तक्रार करत शिवसेनेच्या मंत्र्यांनी या आधीही नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली होती. परंतु, निधी हा काही आपल्या खिशातून देत नाही, राज्याच्या तिजोरीला शिस्त आणण्यासाठी काही पावले उचलली जातात, असे अजित पवारांनी या आधी स्पष्ट केले होते.
भाजपच्या मंत्र्यांचीही तक्रार !
अजित पवारांच्या निधी वाटपावर फक्त शिवसेनेच्याच नव्हे तर भाजपच्या आमदारांनीही नाराजी व्यक्त केली आहे. अमित शाह नांदेडच्या दौऱ्यावर असताना भाजपच्या आमदारांनी त्यांच्याकडे स्टेजवरच तक्रार केली होती, हा मुद्दा अगदी ताजा आहे.
निधी वाटपावरून वाद नाही..
या संदर्भात अजित पवार यांनी सायंकाळी उशिरा पत्रकारांशी बोलताना सांगितले की ‘महायुती’ मध्ये निधी वाटपावरून कसलाही वाद नाही किंवा मानापमान नाट्यही नाही. अर्थमंत्रीपद सांभाळताना काही व्यवधाने सांभाळावी लागतात. त्यातून मग निधीची फिरवाफिरव होते. त्यात गैरव्यवहार झाला, सापत्न पणाची वागणूक मिळाली, असा आरोप करणं चुकीचं आहे. मी मुख्यमंत्री किंवा शिंदेसाहेब यांच्याशी याबाबत सविस्तर बोलणार आहे, असेही ते म्हणाले.