आता समुद्राचे खारे पाणी करता येणार गोड; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांची कामगिरी

DRDO : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने एक मोठे वैज्ञानिक यश मिळवले असून, समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करण्यासाठी त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान नॅनोपोर्स मल्टीलेयर्ड पॉलिमर मेम्ब्रेनच्या आधारे कार्य करते, जे खारे पाणी गाळून पिण्यायोग्य गोड्या पाण्यात रूपांतरित करते.
डीआरडीओच्या संशोधकांनी या तंत्रज्ञानाचा विकास करताना भारतीय तटरक्षक दलाच्या मदतीने क्षेत्रीय चाचण्या यशस्वीरीत्या पार पाडल्या. हे तंत्रज्ञान विशेषतः पाण्याची टंचाई असलेल्या किनारपट्टी भागात, तसेच तटरक्षक दलासाठी उपयुक्त ठरणार आहे. सागरी मोहिमांदरम्यान गोड्या पाण्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
हेही वाचा- निमगाव भोगीत प्रदूषणाचा विळखा: ग्रामस्थांची शरद पवार, उदय सामंत यांच्याकडे न्यायाची मागणी
ही पद्धत केवळ ऊर्जा कार्यक्षम नसून, कमी देखभाल आवश्यक असलेली आणि पर्यावरणस्नेही असल्याने भविष्यात देशातील इतर पाणटंचाई ग्रस्त भागांमध्येही तिचा वापर मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. या यशामुळे भारताच्या संरक्षण संशोधन क्षेत्रात एक नवा मैलाचा दगड ठरला असून, डीआरडीओच्या तंत्रज्ञानाने देशाच्या जलसुरक्षेसाठी एक नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.