राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढला! आज पुणे, नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

पुणे | राज्यात मान्सूनपूर्व घडामोडींना वेग आला असून, अनेक भागांत नागरिकांना तीव्र उष्णता आणि घामाच्या धारांपासून काहीसा दिलासा मिळत आहे. मान्सून राज्यात अधिकृतपणे दाखल होण्यास अजून काही दिवसांचा अवधी असला, तरी त्याआधी सुरू झालेल्या वादळी पावसामुळे कमाल तापमानात घट होऊन वातावरणात गारवा निर्माण होत आहे. दरम्यान, हवामान विभागाने बुधवारी राज्यातील अनेक भागांना मान्सूनपूर्व पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील चार दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या मान्सूनची वाटचाल अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, कोमोरिन परिसर आणि अंदमान समुद्राच्या उर्वरित भागात वेगाने सुरू आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत या भागांमध्ये मान्सूनचा प्रभाव वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
विदर्भाला मिळणार उष्म्यापासून दिलासा
राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण कोकणातील काही भागांत गेल्या काही दिवसांपासून वादळी पावसाची नोंद होत आहे. हा वादळी पावसाचा प्रभाव आता हळूहळू विदर्भाकडे सरकण्याचा अंदाज आहे. यामुळे विदर्भातील नागरिकांना तीव्र उष्णतेपासून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून, पुढील पाच दिवसांत येथील कमाल तापमानात २ ते ४ अंशांची घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हेही वाचा
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जामीन; न्यायालयाकडून कडक अटी
मुंबई-ठाण्यात दमट हवामान
कोकण किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे आणि पालघर येथे मंगळवारी उष्ण व दमट वातावरणाची नोंद झाली. बुधवारीही या भागांसह रायगडमध्ये दमट हवामान राहील. मात्र, पालघर वगळता मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
आज ‘यलो अलर्ट’ कुठे ?
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग, सांगली, सातारा आणि सातारा घाट विभाग, पुणे आणि पुणे घाट विभाग, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नाशिक घाट विभाग आदी भागांना हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर नांदेड, परभणी, जालना, हिंगोली आदी भागात हलक्या सरींची शक्यात हवामान विभागाने व्यक्त केली आहे.





