निमगाव भोगीत प्रदूषणाचा विळखा: ग्रामस्थांची शरद पवार, उदय सामंत यांच्याकडे न्यायाची मागणी

रांजणगाव : “आम्ही नाईलाजास्तव निमगाव भोगीत राहतोय, पण यापुढे आमच्या पिढ्यांचं जगणं अशक्य आहे. प्रदूषणामुळे जमिनी नापीक झाल्या, त्या कुणी घेत नाही. एमआयडीसी आली, पण आमच्या नशिबी ससेहोलपटच आली,” अशी व्यथा निमगाव भोगीच्या ग्रामस्थांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमोर मांडली. प्रदूषणाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा आणि नुकसानभरपाईची मागणी त्यांनी केली.
शिरूर तालुक्यातील माळरानावर एमआयडीसी आणि चासकमान-डिंभा कालव्याच्या पाण्याने समृद्धी आली, पण निमगाव भोगी येथील प्रदूषणाच्या समस्येने ग्रामस्थांचे जगणे असह्य झाले आहे. एमईपीएल कंपनीच्या जलप्रदूषणामुळे शेती नापीक झाली, जनावरे मरत आहेत, तर कर्करोग आणि किडनीच्या आजारांनी लोक त्रस्त आहेत, अशी माहिती स्थानिकांनी शरद पवार यांना दिली.
निमगाव भोगीतील प्रदूषणाचा प्रश्न ऐकून शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. “इथलं चित्र धक्कादायक आहे. उद्योग आणि पर्यावरण विभागाने यावर अंतिम निर्णय घ्यावा. कंपनीला जादा जमीन देण्याचा निर्णय सरकारने स्थगित करावा. शेती आणि जनावरांच्या नुकसानाची भरपाई देण्यासाठी मंत्रिमंडळात निर्णय व्हावा,” असे त्यांनी मनोगतात सांगितले.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. “निमगाव भोगीच्या नागरिकांच्या यातनांकडे दुर्लक्ष होणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – ‘उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का?’ प्रकाश महाजन म्हणाले; “संजय राऊत…”
गावच्या सरपंच ज्योती लक्ष्मण सांबारे यांनी गेल्या १५ वर्षांपासून एमईपीएल कंपनीच्या प्रदूषणामुळे गावकऱ्यांनी सहन केलेल्या त्रासाचा पाढा वाचला. “शेती, जनावरे आणि माणसांचे आरोग्य उद्ध्वस्त झाले. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे,” अशी मागणी त्यांनी लावून धरली. खासदार अमोल कोल्हे यांनीही ग्रामस्थांच्या भावना मांडत या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे सांगितले.
यावेळी माजी आमदार अशोक पवार, सूर्यकांत पलांडे, विकास लवांडे, देवदत्त निकम, सतीश पाचंगे, शेखर पाचुंदकर, विक्रम पाचुंदकर, राहुल गवारे, शशिकांत दसगुडे, यशवंत पाचंगे, भीमराव रासकर, बापूसाहेब शिंदे, संदीप शिंदे, विश्वास ढमढेरे, पूजा गणेश कर्डीले, मल्हारी काळे, कुमार नाणेकर, नाना फुलसुंदर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश थोरात
निमगाव भोगीतील प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लागावा आणि ग्रामस्थांना नुकसानभरपाईसह न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शरद पवार आणि उदय सामंत यांच्या भेटीने ग्रामस्थांना आशेचा किरण दिसू लागला आहे.