नाशिक आयटी कंपनी लैंगिक शोषण प्रकरणी पुण्यातून महिला मॅनेजर ताब्यात

पुणे: शहरातील नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार तसेच एका युवकाचा धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात नाशिक पोलिसांनी कंपनीच्या पुणे येथील मनुष्यबळ विभागातील संशयित महिला व्यवस्थापिकेकडे चौकशी केली. या महिलेकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करून कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचा विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे आणि एका युवकाच्या धर्मातराचा प्रयत्न असे प्रकार उघड झाले. या प्रकरणी एकूण नऊ गुन्हे दाखल असून पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली आहे. न्यायालयाने पाच संशयितांची पोलीस कोठडीत रवानगी केली.
साधारणत: २०२२ ते २०२६ या कालावधीत हे गुन्हे घडले. यातील एक गुन्हा लग्नाचे अमिष दाखवून लैंगिक शोषणाचा तर एक गुन्हा धर्म परिवर्तनाच्या प्रयत्नाचा आहे. या गुन्ह्यांची व्याप्ती, गांभिर्य व संवेदनशीलता लक्षात घेऊन सखोल तपास करण्यासाठी नाशिक पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली. तक्रारदारांमध्ये आठ महिला तर एका युवकाचा समावेश आहे. या युवकाच्या धर्मातराचा प्रयत्न झाल्याचे समोर आले.
हेही वाचा : देशाची ऊर्जा साखळी मजबूत.! १५ हजार टन एलपीजी घेऊन जहाज मुंबईत दाखल
या प्रकरणातील दोन महिला फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तक्रारदार महिलेने कंपनीत घडणाऱ्या गैरप्रकारांबाबत वरिष्ठांकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. परंतु, त्यांंनी तक्रारींची दखल न घेता संशयितांच्या कृत्यास चिथावणी दिली. याच अनुषंगाने तपास पथकाने पुणे येथून कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या प्रमुख महिला व्यवस्थापकीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या संशयित महिलेकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करण्यात आला. भारतीय नागरिक न्याय संहिता कलमांन्वये महिला संशयितास कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिली.
दरम्यान, या गुन्ह्यांची व्याप्ती, गांभिर्य व संवेदनशीलता लक्षात घेऊन सखोल तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सहायक आयुक्त (गुन्हे) यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची स्थापना केली आहे. यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी सर्व खासगी आस्थापनांनी आपल्या कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक ती खबरदारी व प्रतिबंधात्मक उपायोजना कराव्यात. विनयभंग किंवा अत्याचारासंबंधी तक्रार असल्यास पोलीस आयुक्तांच्या व्हॉट्स ॲप ९९२३३२३३११ या क्रमांकावर संदेश पाठवू शकतात. किंवा नियंत्रण कक्षाशी ११२ या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवू शकतात. तक्रारदार महिला, संस्था किंवा माहिती देणाऱ्या व्यक्तींची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.





