Jejuri : खंडोबा गडावर जयाद्री सखिंची दिवाळी — पारंपरिक उत्साहात ‘हरिद्रोत्सव’ साजरा!
पुराणकथांनुसार खंडोबाची राजशाही दिवाळी गडावर साजरी करण्याची परंपरा
जेजुरी | विजयकुमार हरिश्चंद्रे | “एक पणती लावू सखे, अंधार सारा घालवू…” या मंगल वातावरणात खंडोबा च्या गडावर दिवाळीचा पारंपरिक सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला. अठरा पगड जाती–धर्मांची कुलदैवत मानल्या जाणाऱ्या श्री खंडोबा-म्हाळसा देवतेच्या दिवाळी उत्सवाला यंदाही जयाद्री सखी कन्या परिवाराने आपली हजेरी लावली.
पुराणकथांनुसार खंडोबाची राजशाही दिवाळी गडावर साजरी करण्याची परंपरा आजही जपली जाते. पारंपरिक विधीनुसार भूपाळी आरतीने देवाची आळवणी करण्यात आली, तसेच देवसंस्थानच्या वतीने गडावर आकर्षक आकाशकंदील लावण्यात आला. जेजुरीच्या ऐतिहासिक रंगमहाल बालदारी येथे जयाद्री सखी परिवाराने पारंपरिक वेशभूषा परिधान करून रांगोळी काढत समयपूजन केले.
खंडोबाला प्रिय असलेल्या झेंडूच्या फुलांच्या माळा आणि हळदीचा हरिद्रचूर्ण कोटमा या प्रथेनुसार यंदाही गाभाऱ्यात अर्पण करण्यात आला. “हा सण केवळ धार्मिक नसून आपल्या संस्कृतीचा वारसा जपणारा उत्सव आहे,” असे मत जयाद्री सखी परिवाराच्या स्नेहल बाळासाहेब खोमणे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात सानिका गाडवे, वैभवी गावडे, प्रणाली वैद्य यांसह अनेक कन्या सहभागी झाल्या. श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्त कमिटी, जयाद्री सखी कन्या परिवाराच्या वतीने तसेच गुरव, पुजारी, वीर, कोळी, घडशी समाज, खान्देकरी मानकरी, ग्रामस्थ व कर्मचारी वर्गाला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
खंडोबाच्या ऐतिहासिक गडावर पारंपरिक वेशभूषेत साजरी झालेली ही दिवाळी भक्तिभाव, संस्कृती आणि सामाजिक एकतेचे सुंदर प्रतीक ठरली.





