युद्ध अखेर संपलं! अमेरिका-इराणमध्ये अखेर ऐतिहासिक शांतता करार; इराणचं मौन

US Iran Peace Deal | गेल्या चार महिन्यांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेला भीषण लष्करी संघर्ष अखेर संपला आहे. दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक शांतता करार (Peace Deal) झाला असून सर्व आघाड्यांवरील युद्ध तात्काळ थांबवण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या मीडिया प्लॅटफॉर्मवरून ही मोठी घोषणा केली. या करारासाठी मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत या कराराला दुजोरा दिला आहे.
या करारानुसार, जगातील सर्वात महत्त्वाचा आणि संवेदनशील सागरी व्यापारी मार्ग असलेली ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी ‘टॉल फ्री’ सुरू करण्यात येणार असून अमेरिकेच्या नौदलाने केलेली सागरी नाकेबंदी हटवण्याचे अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत.
“जगातील जहाजांनो, इंजिन सुरू करा!” : डोनाल्ड ट्रम्प
करार पूर्ण झाल्याचे जाहीर करताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणसोबतची डील आता पूर्ण झाली आहे. सर्वांचे अभिनंदन! मी या माध्यमातून अधिकृत घोषणा करतो की, होर्मुझची सामुद्रधुनी टॉल फ्री सुरू होईल आणि अमेरिकन नौदलाला नाकेबंदी हटवण्यास मंजुरी देण्यात येत आहे.” या सामुद्रधुनीतून इंधनाचा पुरवठा ज्या देशांना होतो, त्या जगभरातील जहाजांनी आपली इंजिने सुरू करावीत आणि तेलाचा पुरवठा पूर्ववत सुरू होऊ द्यावा, असे आवाहनही ट्रम्प यांनी केले.
हेही वाचा
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची पोस्ट
या शांतता करारात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट करत म्हटले की, “दीर्घ आणि सखोल चर्चेनंतर अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार झाला आहे. दोन्ही पक्षांनी सर्व मुद्द्यांवर, तसेच लेबनॉनमधील लष्करी कारवाई थांबवण्यावर पूर्ण सहमती दर्शवली आहे. पश्चिम आशियातील संघर्षावर मार्ग काढण्यासाठी सहकार्य करणाऱ्या इतर मित्र देशांचे मी आभार मानतो.” हा अधिकृत करार १९ जून रोजी स्वित्झर्लंडमध्ये स्वाक्षरित होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
शांतता करारातील मुख्य १४ मुद्द्यांपैकी प्रमुख मुद्दे:
- कायमस्वरूपी शस्त्रसंधी: लेबनॉनसह सर्व युद्धजन्य आघाड्यांवर तातडीने आणि कायमस्वरूपी शस्त्रसंधी लागू केली जाईल.
- अंतर्गत हस्तक्षेप नाही: अमेरिका इराणच्या अंतर्गत घडामोडींमध्ये किंवा राजकारणात कोणताही हस्तक्षेप करणार नाही.
- नाकेबंदी हटवणार: पुढील ३० दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून अमेरिकेचे नौदल मागे घेतले जाईल आणि नाकेबंदी पूर्णपणे हटवली जाईल.
- सामुद्रधुनी खुली होणार: ३० दिवसांच्या आत इराणकडून होर्मुझचा सागरी मार्ग आंतरराष्ट्रीय जहाजांसाठी पुन्हा खुला केला जाईल.
- पुनर्निर्माणासाठी मदत: इराणच्या युद्धग्रस्त भागाच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका आणि त्याचे सहकारी देश ३०० अब्ज डॉलर्सच्या (३०० अरब) विकास योजना आणतील.
- निर्बंधांतून सवलत: इराणच्या तेल आणि ऊर्जा उत्पादनांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर लादलेले सर्व आर्थिक निर्बंध मागे घेण्यात येतील.
- अण्वस्त्रांवर बंदी: इराणने भविष्यात कधीही अण्वस्त्रे तयार करणार नसल्याचे आपले वचन पुन्हा पाळायचे आहे.
- नवे निर्बंध नाही: अमेरिकेकडून इराणच्या सीमेवरून आपले सैन्य मागे घेतले जाईल आणि इराणवर कोणतेही नवीन निर्बंध लादले जाणार नाहीत.
इराणच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष
डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानने या कराराची अधिकृत घोषणा केली असली, तरी इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून अद्याप सविस्तर आणि थेट अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. प्राथमिक माहितीनुसार, इराणच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांनी या कराराला दुजोरा दिला असून पुढील २ महिन्यांत अंतिम करारासाठी चर्चा होणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, सुरुवातीला इराणने पाकिस्तानच्या काही दाव्यांवर आक्षेप घेतल्याने हा करार प्रत्यक्षात किती मजबूत ठरेल, याबाबत राजकीय तज्ज्ञांमध्ये काहीसे प्रश्नचिन्ह आहे. तरीही, या करारामुळे गेल्या चार महिन्यांपासून ठप्प असलेला जागतिक तेल पुरवठा पुन्हा सुरू होणार असल्याने जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला आहे.





