राज्यात चार ते पाच दिवस कोसळणार पाऊस
विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : ऑगस्ट महिन्यात काहिशी विश्रांती घेतलेल्या पावसाने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात दमदार एन्ट्री घेतली आहे. राज्यातील गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती गणपतीसाठी नागरिकांची एकच लगबग सुरू आहे. तयारी करण्यासाठी दिवस कमी असल्याने सगळ्यांचीच धावाधाव पाहायला मिळत असताना पाऊस काही कमी होताना दिसत नाही. अशातच राज्यातील पुढील चार ते पाच दिवस राज्यात पाऊस ठाण मांडून राहणार आहे. अशी माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ होसाळीकर यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
राज्यात काही ठिकाणी पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर येत्या २४ तासांसाठी मराठवाडा, विदर्भाच्या काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणात ही याचा प्रभाव असणार आहे. आजही पावसाचा जोर कायम असण्याची शक्यता आहे. तर येत्या ४ सप्टेंबरपासून तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे’, असे होसाळीकर यांनी म्हटले आहे.