काँग्रेसची मोठी घोषणा, बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर

Baramati Assembly Election : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून हालचाली सुरू आहेत. मात्र, असं असतानाच आता काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने आकाश मोरे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निर्देशानंतर बारामती पोटनिवडणुकीसाठी आकाश मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सांगण्यात येत आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा काँग्रेस रविवारी सायंकाळी केली आहे. त्यामुळे आता बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.
दरम्यान, महायुतीने अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षाच्या काही नेत्यांना संपर्क साधल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतरही काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा केल्यामुळे आता या निवडणुकीची रंगत वाढली आहे.
काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीसाठी आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. आकाश मोरे हे वकील आहेत. तसेच त्यांचे वडील आमदार होते. आकाश मोरे यांनी याआधी विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे.
बारामती पोटनिवडणुकीबाबत बोलताना जय पवार यांनी म्हटलं होतं की, “ज्येष्ठ नेते शरद पवारही ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बारामतीमधील सर्व जनतेलाही ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं वाटत आहे. ही निवडणूक होणंच दुःखाची गोष्ट आहे. काँग्रेस उमेदवार देणार असल्याची माहिती मिळत आहे. विरोधकांना ही निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी लढावी. अजित पवार हयात असताना त्यांनी लोकशाहीला प्रथम ठेवलं होतं. त्यांनी कधीही कुणाला निवडणूक लढण्यापासून रोखलं नाही. आम्हीही त्यांचेच विचार घेऊन पुढे जात आहोत. बारामतीमधील लोक अजित पवारांच्या निधनानंतर खूप भावनिक आहेत. त्यामुळे विरोधकांना ही निवडणूक लढवायची असल्यास त्यांनी लढवावी”, असं जय पवार यांनी म्हटलं होतं.





