बोगस बियाणे! अखेर सरकारला आली जाग, आमदारांची समिती ठरविणार नियंत्रण प्रणाली

वर्धा : बोगस बियाणे म्हणजे शेतकऱ्यांवरील मानव निर्मित संकट. विविध नैसर्गिक संकटे झेलणाऱ्या शेतकरी वर्गाच्या माथी बोगस बियाणे पडल्यास त्याचा हंगाम तर वाया जातोच पण आर्थिक फटका आणि कर्जात वाढ आलीच. यावर्षी हे संकट गहिरे होते. त्याची दखल घेत देवळीचे आमदार राजेश बकाने यांनी विधिमंडळात ही बाब लक्षवेधी लावून मांडली.
उगवण क्षमता नसणारे सोयाबीन बियाणे विकल्या गेली. म्हणून हंगाम वाया गेला. त्याचा वाईट परिणाम म्हणजे शेतकरी कर्जबाजारी झाला. काहींनी आत्महत्या केल्यात. पण यास कारणीभूत दोषी बियाणे उत्पादक, विक्रेते व शासकीय तपासणी यंत्रणा मोकाट सुटतात. मग शेतकऱ्यांचा वाली कोण, असा सवाल आ. बकाने यांनी मांडला होता. त्यास अखेर कृषी खात्याने उत्तर दिले आहे.
तपासणी विषयक नवी प्रणाली तयार करण्याचा निर्णय झाला आहे. बियाणे तपासणीतील उत्तरदायित्व ठरविण्यासाठी स्टँडर्ड ओपॅरेटिंग प्रोसिजर म्हणजेच ‘ सोप ‘ तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. कृषी मंत्री, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर तसेच आमदार सर्वश्री भास्कर जाधव, कैलास घाडगे पाटील, हेमंत ओगले, हरीश पिंपळे, सुमित वानखेडे, रणधीर सावरकर, समीर कुणावार, राजेश बकाने, सई प्रकाश डहाके, डॉ. संजय कुंटे, चरनसिंग ठाकूर हे आमदार समितीत आहे. ही समिती बियाणे तपासणी व त्यातील हलगर्जीपणा, दोषी बियाणे कंपन्या व विक्रेते यांच्यावर अंकुश ठेवणे आणि कारवाई बाबत प्रणाली तयार करणार. त्यासाठी इतर राज्यात असणारी तशी व्यवस्था अभ्यासणार. एक महिन्यात या समितीस नवी देखरेख प्रणाली तयार करून शासनास सादर करायची आहे.
हेही वाचा – चांदीच्या किमतीत मोठी वाढ ! पहिल्यांदाच २.५० लाखांच्या पुढे ; जाणून घ्या का वाढल्या किंमती ?
यासाठी पाठपुरावा करणारे आमदार बकाने म्हणतात की ही केवळ शासकीय समिती नसून लढ्याचा पहिला टप्पा आहे. बोगस बियाण्यामुळे शेकडो शेतकरी उध्वस्त झाले आहे. त्यास चाप बसला नाही म्हणून बोगस बियाणे मार्केट वाढतच आहे. आता जबाबदारी निश्चित होईल. दोषीवर कठोर कारवाई करण्याची तरतूद असावी म्हणून एक समिती सदस्य नात्याने मी पुढाकार घेणार. आता तपासणी यंत्रणा जबाबदारी टाळू शकणार नाहीच.
यावर्षी विदर्भातील अनेक जिल्ह्यात बोगस बियाणे कंपन्यांनी हैदोस घातला होता. घेतलेले बियाणे उगवलेच नाही. परिणामी खरीप हंगाम वाया गेला. उगवण क्षमता नसलेली बियाणे घेतल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. ही बाब आमदार बकाने यांनी निदर्शनास आणल्यावर पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी चौकशीचे आदेश दिले होते.




