IMD Monsoon Update : हवामान विभागाकडून मान्सून बाबत मोठी गुड न्यूज, नवा अंदाज काय?

IMD Monsoon Update : भारतामध्ये मान्सून कधी दाखल होणार? याची सर्वजण अतुरतेनं वाट पाहत आहेत. भारत हा कृषीप्रधान देश असून, भारतामधील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते, त्यामुळे आता शेतकऱ्यांचे डोळे देखील मान्सूनच्या भारतामधील आगमनाकडे लागले आहेत. गेल्या वर्षी देशासह राज्यात वेळेच्या आधीच मान्सून दाखल झाला होता. मान्सूनचं प्रमाण देखील चांगलं होतं, गेल्या वर्षी अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं. महाराष्ट्राला देखील मोठा फटका बसला होता. दरम्यान मान्सून संदर्भात आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आता लवकरच भारतात मान्सूनची एन्ट्री होण्याची शक्यात आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनची भारताच्या दिशेनं वेगानं आगेकूच सुरू आहे. याही वर्षी वेळेच्या आधीच मान्सून भारतामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनचे मोठे ढग वेगाने तयार होण्यास सुरुवात झाली आहे. उपग्रहाकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतात मान्सूनचं आगमन होण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. मान्सूनच्या मोठ्या ढगाची वाटचाल भारतीय किनारपट्टीच्या दिशेनं सुरू झाली आहे. अरबी समुद्रात देखील मान्सूनसाठी पोषक वातावरण आहे.
दरम्यान यावर्षी देखील वेळेपूर्वीच मान्सून भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन लवकरच होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांमध्ये केरळ, कर्नाटक आणि लक्ष्यद्विपमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
मात्र दुसरीकडे एक चिंताजनक बातमी म्हणजे यंदाच्या मान्सूनवर अल निनोचं सावट असणार आहे. अल निनोमुळे यंदा देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. अल निनोमुळे केवळ भारतामध्येच नाही तर जागातील अनेक देशांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारत सरकारसह महाराष्ट्र सरकारने तयारी सुरू केली आहे.





