शेतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि गुणवत्तेला प्राधान्य; कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

पुणे | शेतीमध्ये प्रयोगशील अधिकारी, निवृत्त अधिकारी, प्रयोगशील शेतकरी, विद्यापीठातील संशोधन आणि परदेशातून आलेले ज्ञान यांचा समन्वय साधून पिकांचे वाण लोकाभिमुख करण्याचे प्रयत्न आगामी काळात केले जातील, असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. शासकीय खर्चातून भांडवली गुंतवणूक करून शेती उत्पादनात वाढ कशी करता येईल, याबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय कृषी अधिकारी व कर्मचारी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल, विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि शेती क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.
कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, “समाजात आरोग्याविषयी जागरूक असलेला आणि गुणवत्तेला महत्त्व देणारा वर्ग आहे. अन्न कितीही महाग असले तरी ते खरेदी करण्याची त्यांची तयारी आहे. केवळ उत्पादनात वाढ होणे म्हणजे स्वयंपूर्णता नव्हे, तर उत्पादनाची गुणवत्ता राखणे, त्याची योग्य जाहिरात करणे आणि बाजारपेठेत चांगला भाव मिळवणे ही मूल्यसाखळी निर्माण करणे गरजेचे आहे.”
हवामान बदलामुळे शेतीपुढील आव्हानांवरही त्यांनी प्रकाश टाकला. “एका क्षणात शेतीचे प्रचंड नुकसान होते. अशा वेळी शेतकऱ्यांना ज्ञान आणि संरक्षण देणे ही काळाची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सारख्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर काही शेतकरी करत आहेत. या प्रयोगांना खात्री आणि आधार देण्याचे काम शासन करेल,” असे ते म्हणाले.
हेही वाचा : Donald Trump | डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतासह 75 देशांना दिलासा, अमेरिकेचा टॅरिफवर 90 दिवसांचा पॉज
कृषी हॅकेथॉन आणि तंत्रज्ञानाचा प्रसार
शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी ‘कृषी हॅकेथॉन’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रयोगशील शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होईल आणि नवकल्पनांना प्रोत्साहन मिळेल. “केवळ कृषी विद्यापीठांवर अवलंबून न राहता, शेतकऱ्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणे हा आमचा उद्देश आहे,” असे कोकाटे यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांसाठी सुविधा आणि समन्वय
कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देताना त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसाठी मनापासून काम करावे. “कृषी सहायकांना लॅपटॉप देण्याचा निर्णय घेतला असून, उच्च तंत्रज्ञानाने सक्षम कर्मचारी वर्ग तयार करण्याचा प्रयत्न आहे,” असे त्यांनी नमूद केले. तसेच, मोठ्या शहरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांशी समन्वय साधून शेतकऱ्यांच्या मालाची तात्काळ विक्री करण्याचे नियोजन असल्याचेही ते म्हणाले.
आत्मनिर्भर महाराष्ट्रासाठी प्रयत्न
कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी सांगितले, “आत्मनिर्भर महाराष्ट्रासाठी कृषी क्षेत्राची प्रगती महत्त्वाची आहे. शासनाने भांडवली गुंतवणुकीचा निर्णय घेतला असून, शेतकरी स्वावलंबी कसा होईल यावर भर आहे. ‘आपल्याला विकेल ते पिकेल’ हा दृष्टिकोन ठेवून काम करायचे आहे.” कार्यशाळेतील विचारमंथनाचे नियोजन आणि अंमलबजावणी महत्त्वाची असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
कार्यशाळेचा उद्देश
कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, या कार्यशाळेत शेतकऱ्यांच्या समस्या, आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादनाच्या गुणवत्तेवर चर्चा होणार आहे. “देशाचे कृषी उत्पादन वाढले असले तरी ग्राहक गुणवत्तेबाबत संभ्रमित आहे. यावर उपाययोजना शोधणे आणि दिशा ठरवणे हा कार्यशाळेचा उद्देश आहे,” असे ते म्हणाले.
कार्यशाळेत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान पुस्तिकेचे प्रकाशन झाले. राज्यभरातून सुमारे २,२०० प्रतिनिधी, अधिकारी, शेतकरी आणि तज्ज्ञ यांनी यात सहभाग घेतला.