Anna Bansode। पिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभा उपाध्यक्षांबरोबर माजी आमदारांचे वाभाडे!
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माजी आमदारांना 'पक्षनिष्ठे'वरून झाडले

पिंपरी- चिंचवड : राजकारणात ठाम भूमिका घेत एकनिष्ठ राहावे लागते. तुमचे सतत तळ्यात मळ्यात सुरू असते. असे केल्यामुळेच तुम्ही आजवर मागे राहिलात. अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार विलास लांडे यांना भर व्यासपीठावरून चांगलेच झाडले. तर तुमच्या चिरंजीवाला जरा समजावून सांगा. घरातील व्यक्तीने चुकीचे कृत्य केल्यास स्वतःची, पक्षाची, सरकारची बदनामी होते, असा सल्ला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनाही दिला.
विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी अजित पवार बोलत होते. या सत्कार सोहळ्यासाठी माजी आमदार विलास लांडे सर्वात पुढे होते. आयोजनात पुढाकार घेणाऱ्या माजी आमदारांना मात्र अजित पवार यांनी चांगलेच सुनावले.
अजित पवार म्हणाले विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे भोसरीचे उमेदवार अजित गव्हाणे यांचा प्रचार करणारे माजी आमदार विलास लांडे नेमक्या कोणत्या पक्षात याबाबत लोक मला विचारतात. सर्वच म्हणतात लांडे आपलेच आहेत. सर्वपक्षीय राहिल्यामुळे त्यांना काहीच मिळत नाही. त्यामुळे काहीतरी भूमिका घ्यावी लागते. लांडे यांचे तळ्यातमळ्यात सुरू असते. एकनिष्ठ राहणारे बनसोडे कोठे गेले हे बघा, असे सांगत लांडे यांना एक भूमिका घेण्याची सूचना पवार यांनी केली.
पक्षाची बदनामी होते… विधानसभा उपाध्यक्षांना सुनावले
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या कौतुक करण्यात अजित पवार यांनी बनसोडे यांनाही चांगलेच झापले. “आता सकाळी लवकर कामाला लागा, लोकांना वेळ द्या, विधानसभेला वेळ द्यावा लागेल. जेवढं महत्त्वाचे पद, तेवढे जास्त कष्ट घ्यावे लागतात. तुमच्या चिरंजीवाला जरा समजावून सांगा. घरातील व्यक्तीने चुकीचे कृत्य केल्यास स्वतःची, पक्षाची, सरकारची बदनामी होते, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बनसोडे यांना दिला.