Donald Trump | डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतासह 75 देशांना दिलासा, अमेरिकेचा टॅरिफवर 90 दिवसांचा पॉज

Donald Trump Pause Tariff | अमेरिकेच्या ट्रेड आणि टॅरिफ वॉरमध्ये एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी एक महत्त्वाचा आदेश जारी केला, ज्याने चीनला मोठा दणका देताना भारतासह 75 हून अधिक देशांना दिलासा दिला आहे. या नव्या निर्णयामुळे अमेरिकन शेअर बाजारातही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
ट्रम्प यांनी 75 पेक्षा जास्त देशांसाठी जाहीर केलेल्या रेसिप्रोकल टॅरिफवर 90 दिवसांची स्थगिती जाहीर केली आहे. हे ते देश आहेत, ज्यांनी अमेरिकेसोबत ट्रेड, टॅरिफ, करन्सी मॅनिप्युलेशन आणि इतर नॉन-मोनेटरी मुद्द्यांवर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. या कालावधीत या देशांविरुद्ध अमेरिकन सरकार कोणतीही कठोर कारवाई करणार नाही. या स्थगितीच्या काळात परस्पर शुल्कातही लक्षणीय कपात करण्यात आली असून, ते आता केवळ 10% इतके ठेवण्यात आले आहे. यामुळे या देशांना पुढील रणनीती आखण्यासाठी वेळ मिळणार आहे.
हेही वाचा : Sunny Deol | सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचा धक्का; २२ दृश्यांना कात्री
मात्र, चीनच्या बाबतीत ट्रम्प यांनी कठोर भूमिका कायम ठेवली आहे. चीनवर आधीच असलेल्या टॅरिफमध्ये आणखी वाढ करण्यात आली असून, आता तो 125 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. याआधी ट्रम्प यांनी चीनला इशारा दिला होता की, जर 8 एप्रिलपर्यंत चीनने आपला 34% टॅरिफ वाढीचा निर्णय मागे घेतला नाही, तर 9 एप्रिलपासून अमेरिका 50% अतिरिक्त टॅरिफ लागू करेल. तसेच, चीनसोबत प्रस्तावित कोणतीही बैठक रद्द करून इतर देशांशी नव्या वाटाघाटी तातडीने सुरू केल्या जातील, अशी धमकीही त्यांनी दिली होती. आता चीनवर 125% टॅरिफ लागू झाल्याने दोन्ही देशांमधील व्यापार युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
या निर्णयाचा परिणाम तात्काळ दिसून आला असून, अमेरिकन शेअर बाजारात मोठी तेजी नोंदवली गेली. गुंतवणूकदारांनी या स्थगितीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दुसरीकडे, चीनवर वाढलेल्या टॅरिफमुळे जागतिक व्यापारावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ट्रम्प यांच्या या नव्या धोरणामुळे भारतासह इतर देशांना आपली रणनीती आखण्यासाठी संधी मिळाली असली, तरी चीन आणि अमेरिका यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा