महाराष्ट्रातील ‘या’ बॅंकेवर आरबीआयची मोठी कारवाई; खातेदारांना आता ‘इतके’च पैसे काढता येणार, तुमचं खातं आहे का?

RBI restrictions : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मुंबईतील मोगावीरा सहकारी बँकेची आर्थिक स्थिती खालावल्याच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई करत सहा महिन्यांसाठी विविध निर्बंध लागू केले आहेत.
या निर्बंधांनुसार बँकेच्या खातेदारांना त्यांच्या बचत, चालू किंवा इतर खात्यांमधून कमाल एक लाख रुपयांपर्यंतच रक्कम काढण्याची परवानगी असेल. हे निर्बंध १२ जून रोजी कामकाज संपल्यानंतर लागू झाले असून पुढील सहा महिने प्रभावी राहतील. मात्र, परिस्थितीनुसार त्यांचा आढावा घेतला जाणार आहे.
आरबीआयने जारी केलेल्या निर्देशांनुसार, मोगावीरा सहकारी बँक यापुढे कोणतेही नवीन कर्ज मंजूर करू शकणार नाही किंवा विद्यमान कर्जांचे नूतनीकरणही करू शकणार नाही. तसेच बँकेला नवीन गुंतवणूक करण्यास, नवीन दायित्व स्वीकारण्यास, कर्ज उभारण्यास आणि नवीन ठेवी स्वीकारण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
हेही वाचा – भारताने पहिल्या वनडे सामन्यात अफगाणिस्तानला नमवलं, शुबमन गिलची विजयी खेळी
आरबीआयने (RBI) स्पष्ट केले की, बँकेच्या कामकाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी संचालक मंडळ आणि वरिष्ठ व्यवस्थापनाशी सातत्याने संपर्क ठेवण्यात आला होता. मात्र, देखरेखीसंदर्भातील त्रुटी दूर करण्यासाठी बँकेकडून कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत. ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी हे निर्बंध लागू करणे आवश्यक ठरल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात आरबीआयने महाराष्ट्रातील फलटण येथील ‘द यशवंत सहकारी बँके’चा परवाना रद्द केला होता. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि उत्पन्नाची क्षमता नसल्याने तसेच बँकिंग नियमन कायद्याच्या काही तरतुदींचे पालन करण्यात अपयश आल्याने हा निर्णय घेण्यात आला होता.





