‘आदित्य ठाकरेंनी पळ काढण्यापेक्षा चौकशीला सामोरे जावे’; शंभूराज देसाई

कराड : कोणत्याही प्रकारच्या आरोपांपासून पळ काढण्यापेक्षा चौकशीला सामोरे जाणे हेच योग्य असल्याने मुंबईतील करोना महामारी काळातील विविध घोटाळ्यांच्या चौकशीला आदित्य ठाकरेंनी सामोरे जावे, असा सूचक इशारा राज्याचे पर्यटनमंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कराडमध्ये पत्रकारांशी बोलताना दिला.
शंभूराज देसाई म्हणाले, मुंबईतील करोना महामारी काळातील विविध घोटाळ्यांबाबत पहिला चौकशी अहवाल लवकरच बाहेर येणार आहे. मृतदेह ठेवण्याची पिशवी (बॉडी बॅग्स), खिचडी पुरवठा तसेच नालेसफाई कंत्राटांमध्ये कोणी पैसे खाल्ले, याबाबत सखोल चौकशी व्हावी.
मुंबई महानगरपालिका त्या काळात कोण चालवत होती? हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी या चौकशीला सामोरे जावे, असे थेट आव्हानच देसाई यांनी दिले आहे. कोणत्याही प्रकारच्या आरोपांपासून पळ काढण्यापेक्षा चौकशीला सामोरे जाणे हेच योग्य असल्याचे ते आदित्य ठाकरे यांना म्हणाले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कधीकधी हप्ता तांत्रिक कारणामुळे उशिरा पोहोचतो. मात्र, त्याचा अर्थ असा नाही की ही योजना बंद होत आहे. ही योजना सुरुच राहणार असून, हप्तेही दिले जातील, अशी ठाम ग्वाही मंत्री देसाई यांनी दिली.
हेही वाचा – तेव्हा आम्ही एकत्र…. अजितदादांचं राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर विधान
‘महायुती’तील निर्णय हे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघे मिळून घेतात आणि आमची जबाबदारी त्यांची अंमलबजावणी करण्याचे आहे. सातारा जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा होणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कारण, या निवडणुका शिवसेना आणि महायुती एकत्रितपणे लढवणार असल्याची भूमिका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यापूर्वीच स्पष्ट केल्याचे देसाई यांनी सांगितले.
खासदार संजय राऊत यांनी केलेले आरोप, टीका याबाबत विचारताच मंत्री देसाई हे आक्रमकपणे म्हणाले, मीच तुम्हाला पत्रकारांच्या भूमिकेत विचारतो की, संजय राऊत यांनी ज्या ज्या गोष्टी जाहीर केल्या, त्यातील कोणती गोष्ट खरी झाली, ते आम्हाला सांगा. त्यांच्याकडे तुम्ही सकाळी बुम घेवून जाता, त्यामुळे ते बोलतात. तुम्ही आठ दिवस त्यांच्याकडे जाऊ नका, ते काहीही बोलणार नाहीत. असे शंभूराज देसाई यांनी पत्रकारांना सुचवले.