RCBची फायनलमध्ये धडक! पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सचा ९२ धावांनी दणदणीत पराभव

IPL 2026 | आयपीएल २०२६ च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाने दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत गुजरात टायटन्सचा ९२ धावांनी पराभव केला आणि थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. आरसीबीने दिलेल्या २५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा डाव १६२ धावांवर आटोपला. या पराभवानंतरही गुजरात टायटन्सला अंतिम फेरीत पोहोचण्याची आणखी एक संधी मिळणार असून, ते २९ मे रोजी दुसरा क्वालिफायर सामना खेळतील.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या आरसीबीची सुरुवात मध्यम राहिली. सलामीवीर वेंकटेश अय्यर १९ धावांवर बाद झाल्यानंतर विराट कोहली (४३ धावा) आणि देवदत्त पडिक्कल (३० धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी करत डाव सावरला. मात्र, सामन्याचे खरे आकर्षण ठरला तो कर्णधार रजत पाटीदार. दोन वेळा जीवदान मिळाल्याचा पूर्ण फायदा उठवत पाटीदारने अवघ्या ३३ चेंडूत ५ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने नाबाद ९३ धावांची झंझावाती खेळी केली. त्याला कृणाल पंड्याची (४३ धावा) आणि अखेरच्या षटकांत जितेश शर्माची (१५ धावा) उत्तम साथ लाभली. यामुळे आरसीबीने निर्धारित २० षटकांत २५४ धावांचा डोंगर उभा केला, जी आयपीएल प्लेऑफच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. गुजरातकडून कगिसो रबाडा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
हेही वाचा
इबोलाची भारतात एन्ट्री? युगांडाहून बंगळुरूत आलेल्या तरुणीला रुग्णालयात विलगीकरणात ठेवले
गुजरातच्या डावाला सुरुवातीलाच खिंडार
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. आरसीबीच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर पॉवरप्लेमध्येच गुजरातने ५ महत्त्वाचे फलंदाज गमावले. साई सुदर्शन १४ धावांवर हिट विकेट झाला, तर कर्णधार शुबमन गिल अवघ्या २ धावांवर भुवनेश्वर कुमारचा बळी ठरला. जोश हेझलवूडने सेट झालेल्या जोस बटलरला २९ धावांवर त्रिफळाचीत केले. रसिख सलामने टाकलेले सहावे षटक सामन्याला कलाटणी देणारे ठरले, ज्यामध्ये त्याने एकही धाव न देता (डबल विकेट मेडन) निशांत सिंधु आणि जेसन होल्डर यांना बाद करून गुजरातचे कंबरडे मोडले.
तेवतियाची एकाकी झुंज अपयशी
५ बाद ५६ अशा बिकट परिस्थितीत सापडलेल्या गुजरातसाठी राहुल तेवतियाने एकट्याने किल्ला लढवला. त्याने ४३ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह ६८ धावांची झुंजार खेळी केली. मात्र, इतर फलंदाजांकडून साथ न मिळाल्यामुळे त्याची ही खेळी व्यर्थ ठरली. वॉशिंग्टन सुंदर (८), रशीद खान (८) आणि कगिसो रबाडा (९) झटपट बाद झाले. आरसीबीकडून गोलंदाजीत जेकब डफीने सर्वाधिक ३ बळी घेतले, तर रसिख सलाम आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. हेझलवूड आणि कृणाल पंड्या यांनी प्रत्येकी १-१ बळी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. आरसीबीच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे त्यांनी दिमाखात फायनलमध्ये धडक मारली आहे.





