इबोलाची भारतात एन्ट्री? युगांडाहून बंगळुरूत आलेल्या तरुणीला रुग्णालयात विलगीकरणात ठेवले

Ebola Virus | आफ्रिकेतील इबोला (Ebola) विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतातही कडक खबरदारी घेतली जात असून, युगांडामधून भारतात आलेल्या एका २८ वर्षीय तरुणीला बंगळुरूमध्ये विलगीकरणात (Quarantine) ठेवण्यात आले आहे. ही तरुणी २३ मे रोजी बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली होती. तिला सध्या इंदिरानगर येथील साथरोग रुग्णालयात ठेवण्यात आले असून, ‘पीटीआय’चा हवाला देत ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने हे वृत्त दिले आहे.
आरोग्य विभागाचे प्रधान सचिव ऋत्विक रंजनम पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेमध्ये सध्या तापासारखी कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत. मात्र, तिला थकवा आणि अंगदुखी जाणवत असल्याचे विमानतळ प्राधिकरणाच्या लक्षात येताच तिचे रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. हे नमुने पुढील तपासणीसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत (National Institute of Virology – NIV) पाठवण्यात आले असून पहिल्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, युगांडाहून आल्यानंतर ती महिला सुरुवातीला एका हॉटेलमध्ये राहिली होती. त्यानंतर तिला अंगदुखीसारखी सौम्य लक्षणे दिसू लागल्याने तिला तात्काळ सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असून डॉक्टर तिच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. नियमानुसार, पुण्याच्या एनआयव्हीकडून पहिला अहवाल आल्यानंतर तिची पुन्हा एकदा चाचणी केली जाणार आहे.
हेही वाचा
राज्यात इंधन टंचाई ही ‘कृत्रिम’, साठेबाजीचा संशय; विक्रीसंदर्भातील आकडेवारी काय सांगते?
जागतिक आरोग्य आणीबाणी आणि कर्नाटक सरकारची नियमावली
आफ्रिकेच्या काही भागांमध्ये इबोलाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने १७ मे रोजी डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि युगांडा येथील परिस्थिती पाहता आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. या सतर्कतेनंतर कर्नाटक आरोग्य विभागाने एक विशेष सूचना जारी केली आहे. त्यानुसार, इबोलाग्रस्त देशांमधून परतणाऱ्या सर्व नागरिकांना भारतात आल्यानंतर पुढील २१ दिवस स्वतःच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आणि देखरेख करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भारत सरकारचे प्रवाशांसाठी कडक नियम
भारत सरकारने इबोला विषाणूबाबत जारी केलेल्या सूचनेनुसार, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान येथून येणाऱ्या आणि ताप, अशक्तपणा, डोकेदुखी, स्नायूदुखी, उलट्या, जुलाब, घसा खवखवणे किंवा अस्पष्ट रक्तस्त्राव यासारखी लक्षणे असलेल्यांनी विमानतळावर आगमन केल्यावर विमानतळ आरोग्य अधिकाऱ्याला कळविणे बंधनकारक आहे. ज्या प्रवाशांचा रक्त किंवा शरीरातील द्रवांशी किंवा इबोलाची लागण झाल्याचा संशय असलेल्या किंवा लागण झाल्याची पुष्टी झालेल्या व्यक्तीशी थेट संपर्क आलेल्यांनीही आरोग्य अधिकाऱ्याला माहिती द्यावी. याव्यतिरिक्त एखाद्या प्रवाशाला प्रवासाच्या २१ दिवसांच्या आत लक्षणे दिसल्यास, त्यांनी स्वतःला विलगीकरणात ठेवावे.





