2 हजार एसटी निघणार भंगारात; एसटी महामंडळाचा निर्णय

मुंबई : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या 2 हजार बसेस आता भंगारात काढण्यात येणार आहेत. धातू भंगार व्यापार महामंडळाच्या (एमएसटीसी ) माध्यमातून या बसचा लिलाव करण्यात येणार आहे. राज्यभरातील 32 आगारांमध्ये सध्या या बसेस उभ्या असून, त्या मुंबईमध्ये उच्च बोलीदाराला विकण्यात येणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात सुमारे 14 हजार बसेस असून, वयोमर्यादेमुळे जुन्या झालेल्या बसेस भंगारात काढण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी सुमारे 2 हजार बसेस भंगारात निघत असून, येत्या दोन ते तीन वर्षांत सुमारे 5 हजार बसेस भंगारात निघणार आहेत. पूर्वीच्या लिलावात 2 ते 2.5 लाखांना प्रत्येक बस, असा महसूल महामंडळाला मिळाला होता.
हेही वाचा – संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन-पाकिस्तानचा दहशतवादी डाव उधळला
राज्य परिवहन विभागाने (आरटीओ) राज्यातील सर्व सार्वजनिक प्रवासी वाहतूक महामंडळांना लिलावामध्ये केवळ राज्यातील बोलीदारांनाच सहभागी करण्याचे निर्देश दिले आहेत. या अगोदर देशभरातील बोलीदार या प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकत होते. आता त्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यासाठी राज्यात केवळ दोनच मोठे बोलीदार असून, एसटीच्या बसला योग्य दर मिळेल का, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे भंगार विक्रीतून मिळणारा एसीटी महामंडळाचा महसूल कमी होऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे.