ठाकरे पॅटर्नचा होतोय क्लेम, कुणावर नेम, कुणाचा गेम ?
उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडला का यशस्वीपणे पार पाडला गेला ? याची आता राजकीय पटलावर उघडपणे चर्चा सुरू आहे. ठाकरे बंधूंचे कार्यकर्ते ‘ठाकरे पॅटर्न’चा ‘क्लेम’ करीत असले तरी यामध्ये ‘कुणीतरी’ डाव टाकून एकावर ‘नेम’ धरला आणि एकाचा ‘गेम’ केला, अशी चर्चा मात्र जोरात सुरू झाली आहे. राजकीय बुद्धिबळाच्या खेळातील ‘राजा’ एकटा पडला आहे आणि ‘वजीर’ कोणती भूमिका घेतो, याकडे लक्ष लागले आहे !
‘ठाकरे पॅटर्न ‘ची गरज कोणाला?
ठाकरे बंधूंचे मनोमीलन हा मुद्दा चर्चेला घ्यायचा तर एकत्र येण्याची जास्ती गरज कोणाला होती याची फोड करायला हवी ! जशी ती उद्धव ठाकरे यांना होती, तशीच ती राज यांनाही होती..प्रमाण थोडेफार कमी जास्त असेल, पण दोघे एकत्र आले तरच पुढील दिशा स्पष्ट दिसणार आहे, नाहीतर भवितव्य अंधारमय आहे, हे कोणीही मान्य करेल!
खूप गमावले, थोडे तरी कमावण्यासाठी!
खूप काही गमावले, म्हणून पुन्हा किमान काहीतरी कमावण्यासाठी भाऊबंदकी विसरून राज यांची ही गळाभेट नक्कीच झाली नव्हती. राज यांचा आजवर अनेक चाणाक्ष नेत्यांनी तोंडी लावण्यासाठी मोठ्या खुबीने उपयोग करून घेतला आहे आणि उद्धव यांनी तर अगदी उघड करवून घेतलेला आहे. त्यातूनच राज यांच्याकडे राजकारणातले डावपेच समजणारे आणि ज्यांची गुप्त मैत्री आजही उद्धव सेनेतल्या काही उरल्या सुरल्या नेत्यांशी आहे, हे लक्षात घ्या ! त्यांना राज यांचे उद्धव यांच्याबरोबर जमवून घेणे दूरदूरपर्यंत मुळीच आवडलेले नाही. किंबहुना, निदान यावेळी तरी पूर्वीसारखे बेसावध राहून त्यांना जाऊन बिलगू नका, असा अगदी तोंडावर प्रेमाचा आणि मोलाचा सल्ला त्यांना पक्षातल्या आणि पक्षाबाहेरच्या अनेकांनी दिला आहे.
बेसावध आणि भावनिक ठेवण्यासाठी..
केवळ म्हणूनच राज यांना बेसावध आणि भावनिक ठेवण्यासाठी उद्धव आपल्या भाषणातून, एकत्र आलो..एकत्र राहण्यासाठी.. असे म्हणाले. ही सुरुवात आहे, असेही ते म्हणाले. थोडक्यात, उद्धव जरी एकी दाखवण्यासाठी तशी वातावरण निर्मिती करायला अधिक उत्सुक वाटले, तरी ती पुन्हा उद्धव यांची पूर्वीसारखी तात्पुरती गरज आहे, हेच वास्तव आहे ! कारण मराठी माणसाला उद्धव-राज यांचे एकत्र येणे जरी मनापासून भावलेले असले, तरी जेव्हा केव्हा या दोघांना कुठेतरी, कोठेतरी सत्तेची संधी चालून येईल, तेव्हा जनतेच्या मनातल्या राज यांना उद्धव कधीही सत्तेत मानाचे स्थान अगदी शंभर टक्के देणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. याउलट, राज यांनी तसा हट्ट धरल्यास पुढल्या क्षणी वेगळे व्हायला उद्धव क्षणाचाही विलंब लावणारे नाहीत, हे जनता ओळखून आहे.
हेही वाचा – ‘अलमट्टी’ उंची वाढ विरोधात दिल्लीत मोर्चेबांधणी, विधीमंडळातील सर्वपक्षीय बैठकीत महत्त्वाचा निर्णय
फक्त मराठीचा मुद्दा, राजकीय अजेंडा नाही!
हे लक्षात घेऊनच राज यांनी ‘महायुती’ वर मर्मभेदी शैलीत थोडक्यात त्यांना फारसे न दुखावता नक्कीच टीका केली. विशेष म्हणजे, देहबोलीतून अर्थ काढत बसू नका, हा मेळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावर आहे, कोणताही राजकीय अजेंडा नाही, असेही ते भाषणातून सतत अधोरेखित करीत होते. थोडक्यात, त्यावेळचे राज केवळ भावनिक भाऊ नाहीत, ते अधिक सावध आहेत, हा संदेश सर्व कार्यकर्त्यांना नक्कीच पोहोचला आहे.
उद्धव सेनेपासून काँग्रेस दुरावली..
उद्धव यांनी केवळ राज ही तात्पुरती सोय करवून घेतलेली आहे, असे म्हणूनच म्हणावेसे वाटते आणितेच नेमके सत्य आहे! याउलट, राज ठाकरे यांना उद्धव असे उघड बिलगल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना यापुढे उद्धव सेनेशिवाय कामाला लागा, अशा सूचना आपल्या महत्वाच्या नेत्यांना द्या, असे थेट गांधी परिवाराकडून त्यांना सांगण्यात आले आहे. मात्र, आज तरी शरद पवारांची आणि त्यांच्या राष्ट्रवादीची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मानसीकता नाही.त्यांचे ‘वेट अँड वॉच’ असे धोरण ठरले आहे. काँग्रेसपेक्षा राज-उद्धव आपल्या अधिक सोयीचे हेच शरद पवारांना वाटत आहे. थोडक्यात, राज्यातली उरली सुरली काँग्रेस एकट्याने महाआघाडीतून बाहेर पडल्याचे दृश्य पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटू देऊ नका !
आता ‘महायुती’ ची भूमिका काय?
आता एक गोष्ट पाहू या. राज ठाकरे जसे उद्धव यांना भेटून एकत्र येऊन मोकळे झाले आहेत, त्याआधी त्यांनी हे असे काही होणार नाही, मी उद्धवशी सत्तेत राजकारणात पुन्हा युती आघाडी नक्की करणार नाही, असा शब्द प्रत्यक्ष भेटून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जरी दिलेला असला तरीही बेसावध न राहण्याची भूमिका भाजपाने घेतलेली आहे आणि त्यादृष्टीने पावले उचलण्याच्या स्पष्ट सूचना तातडीने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना देण्यात आलेल्या आहेत. कारण भाजपा, संघ परिवार यांच्या दृष्टिकोनातून फडणवीसांना सर्कस सरकार चालविण्यासाठी आणि आखलेल्या समस्त योजना पूर्ण करण्यासाठी मोकळीक द्या. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना फारसे यशाचे श्रेय मिळणार नाही, याची काळजी घेत एकदम मोकळे सोडा, त्यांना यात अजिबात गुंतवून ठेऊ नका, अशाही सख्त सूचना राज्यातल्या महत्वाच्या भाजपा नेत्यांना वरून देण्यात आल्या आहेत, हे पण विचार करण्यासारखे आहे.
श्रीराम-भरत भेट नक्कीच नव्हती..
आजही राज ठाकरे यांना ‘महायुती’ पासून दूर जायचे नाही, तेच ‘महायुती’ चेही नक्की ठरले आहे म्हणून राज-उद्धव यांच्या मेळाव्यानंतर भाजपा, शिंदे गटाच्या नेत्यांनी टीकेतून केवळ उद्धवजींना ‘टार्गेट’ केले. कुठेही त्यात राज ठाकरेंवर टीका नव्हती. महत्वाचे तेच आहे, की ही काही राम आणि भरत भेट नक्कीच नव्हती ! तो जिव्हाळा, पूर्वीचे ते प्रेम त्यात अजिबात नव्हते. तर गरजेतून आणि सत्तेच्या तडफडीतून उद्धव कधी नव्हे ते चार पावले मागे आले, बॅकफूटवर आले! त्यांनीही स्वतःची तात्पुरती सोय लावून घेतली आहे..त्यांचे कार्यकर्ते खुश आहेत आणि महाविकास आघाडी अधांतरी झाली आहे !
भाजपाचा गेम तर नाही ना?
या सर्व घडामोडीमागे चाणक्यनीती नक्कीच असावी. एकूणच उद्धव ठाकरेंवर खतरनाक गेम झाला आहे, असेच वाटते. मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर धरली तर ३५ टक्के मराठा मतदान, त्यातील २० टक्के जाणार ‘महायुती’ ला..१० टक्के उद्धव यांना आणि शिल्लक अन्य ठिकाणी! पण, महत्वाचं म्हणजे जे हिंदी भाषिक मतदान आहे, ते सगळं ‘महायुती’ ला मिळणार, यात काही शंका नाही. त्यामुळे राज ठाकरेंना सुमारे २५ टक्के, एकनाथ शिंदेंना सुमारे ३० टक्के आणि भाजपला ४० टक्के जागा, थोड्याफार अजित दादांना.. असा हा फॉर्म्युला निश्चित ठरलेला आहे. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांनी मिळून ‘महा विकास आघाडी’ ची ‘महा भकास आघाडी’ ला करून टाकली आहे, यावर विश्वास ठेवण्यासारखी वस्तुस्थिती आहे, हे निश्चित !





