ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका क्रीडा विभागाचे होणार ‘क्रीडा, कला, साहित्य, पर्यटन विकास व सांस्कृतिक विभाग’ असे नामकरण

नगरसेवक योगेश लांडगे यांच्या प्रस्तावाला क्रीडा समितीची मान्यता

पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभेच्या मंजुरीकडे लक्ष

पिंपरी-चिंचवड | पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी क्रीडा, कला, साहित्य, पर्यटन आणि सांस्कृतिक क्षेत्रांना एकत्रित व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने क्रीडा विभागाचे नामकरण ‘क्रीडा, कला, साहित्य, पर्यटन विकास व सांस्कृतिक विभाग’ असे करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव महापालिका सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.

नगरसेवक तथा क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सदस्य योगेश लांडगे यांनी या विषयासाठी पुढाकार घेतला असून, शहराच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक विकासाला गती देण्यासाठी स्वतंत्र आणि व्यापक धोरणाची आवश्यकता असल्याचे त्यांनी मांडले आहे.

शहरातील क्रीडा उपक्रमांसोबतच संगीत, साहित्य, ग्रंथालये, स्पर्धा परीक्षा केंद्रे, अभ्यासिका, पर्यटनस्थळे आणि सांस्कृतिक केंद्रे यांचा समन्वय साधून एकात्मिक विकास साधणे गरजेचे आहे. सध्या क्रीडा विभागाच्या कार्यक्षेत्रात विविध कला, साहित्य व सांस्कृतिक उपक्रमांशी संबंधित आस्थापनांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व क्षेत्रांना एकत्रित स्वरूप देण्यासाठी विभागाचे नामकरण बदलण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे.या प्रस्तावानुसार शहरातील क्रांतिवीर चापेकर वाडा, महानगरपालिकेची प्रेक्षागृहे व नाट्यगृहे, पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी, सार्वजनिक ग्रंथालये, स्पर्धा परीक्षा केंद्रे आणि अभ्यासिका यांसारख्या संस्थांच्या कामकाजाला अधिक व्यापक दिशा मिळणार आहे.

हेही वाचा

जूनमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ४७ हजार ७६६ टन कचऱ्याचे संकलन

योगेश लांडगे यांनी सांगितले की, “पिंपरी चिंचवड शहराचा विकास केवळ भौतिक सुविधांपुरता मर्यादित नसून नागरिकांच्या क्रीडा, कला, साहित्य आणि सांस्कृतिक गरजांची पूर्तता करणारा असणे आवश्यक आहे. सर्व संबंधित क्षेत्रांसाठी एकसंध धोरण तयार केल्यास शहरातील प्रतिभांना मोठी संधी उपलब्ध होईल.”

क्रीडा, कला, साहित्य, पर्यटन व सांस्कृतिक क्षेत्रांना प्रोत्साहन देणे, प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणणे आणि या क्षेत्रांचा समन्वित विकास साधणे हा या प्रस्तावामागील मुख्य उद्देश आहे. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या ठरावानंतर आता हा विषय महापालिका सर्वसाधारण सभेत अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात आला असून, सभेच्या निर्णयाकडे शहरातील सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

“पिंपरी चिंचवड शहराचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून नागरिकांच्या क्रीडा, कला, साहित्य, पर्यटन आणि सांस्कृतिक जडणघडणीशीही जोडलेला आहे. शहरातील गुणवंत खेळाडू, कलाकार, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिभांना योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी सर्व क्षेत्रांचा एकत्रित आणि नियोजनबद्ध विकास होणे आवश्यक आहे. क्रीडा विभागाचे ‘क्रीडा, कला, साहित्य, पर्यटन विकास व सांस्कृतिक विभाग’ असे नामकरण केल्यामुळे या सर्व क्षेत्रांसाठी व्यापक धोरण आखणे, विविध उपक्रमांना चालना देणे आणि प्रशासनामध्ये अधिक सुसूत्रता आणणे शक्य होईल. पिंपरी चिंचवडला क्रीडा, कला आणि संस्कृतीची समृद्ध ओळख निर्माण करून देण्याचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.”

– योगेश लांडगे, नगरसेवक तथा सदस्य, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button