पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६: स्पर्धामार्गावरील शाळा २३ जानेवारीला १२ नंतर बंद
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे आदेश

पिंपरी | पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या चौथ्या टप्प्याच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील स्पर्धा मार्गावरील सर्व सरकारी व खाजगी शाळा २३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु ठेवाव्यात; त्यांनतर शाळा बंद करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.
पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा टप्पा क्रमांक चार छत्रपती शिवाजी स्टेडियम, बालेवाडी येथून सुरुवात होणार आहे. त्यानंतर ही स्पर्धा राजीव गांधी ब्रिजमार्गे पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत प्रवेश करणार असून ती सांगवी, वाकड, निगडी, त्रिवणीनगर, भोसरी, चिखली, पिंपरी काळेवाडी परिसरातून फिरुन परत राजीव गांधी ब्रिज मार्गे पुणे शहर हद्दीत प्रवेश करणार आहे. ही स्पर्धा सुरळीत व सुरक्षितपणे पार पडणेकरीता तसेच नागरिकांची होणारी गैरसोय टाळणेकरीता स्पर्धा मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेली आहे.
हेही वाचा : महापौरपदाची सोडत जाहीर! महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांचे आरक्षण पाहा..
तसेच विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्याकरीता स्पर्धा मार्गावरील सांगवी, वाकड, रावेत, ताथवडे, पुनावळे, निगडी प्राधिकरण, इंद्रायणीनगर, चिंचवड एम.आय.डी.सी, चिखली, काळेवाडी, भोसरी एम.आय.डी.सी., यशवंतनगर पिपरी, त्रिवेणीनगर या परिसरातील सर्व शासकीय व खाजगी शाळा दुपारी १२ वाजेनंतर बंद करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.




