ताज्या घडामोडीराष्ट्रिय

बिहार निवडणूकही ‘हायजॅक’ ?

राहुल गांधी संतापले, भव्य मोर्चा घेऊन निवडणूक आयोग कार्यालयावर धडक, आयोगावर बेछूट आरोप !

पाटणा : निवडणूक आयोग हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भारतीय जनता पार्टीची शाखा असल्यासारखी उत्तरे देत आहे. त्यामुळे, त्यांची भूमिका स्पष्ट आहे. महाराष्ट्र प्रमाणेच बिहारमधील आगामी निवडणूक ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न होतो की काय? अशी शंका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी धडक मोर्चासमोर बोलताना व्यक्त केली.

बिहार निवडणूकही चोरणार ?

महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही निवडणूक चोरण्याचा प्रयत्न होणार आहे कार्यकर्त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि सतर्क राहिले पाहिजे. निवडणूक आयोगाचे आयुक्त संघ परिवार किंवा भाजपाचे प्रवक्ते असल्यासारखे बोलू लागले आहेत, असा राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केला आहे. बिहारमधील पाटणा येथे विरोधकांतर्फे निघालेल्या धडक मोर्चात ते बोलत होते.

बिहारमधील मतदार याद्याच बोगस..

बिहारमधील मतदार याद्यांच्या तपासणीला विरोधी पक्ष विरोध करत आहेत. त्याचा उल्लेख करून राहुल गांधी यांनी आरोप केला की ज्याप्रमाणे महाराष्ट्राच्या निवडणुका चोरीला गेल्या, त्याचप्रमाणे बिहारच्या निवडणुका चोरण्याचा प्रयत्न केला जाईल. आम्हाला महाराष्ट्र मॉडेल समजले आहे, हे भाजपाच्याही लक्षात आले आहे. त्यांनी आता ‘बिहार मॉडेल’ आणले आहे. गरिबांची मते हिसकावून घेण्याचा हा एक मार्ग आहे, त्या विरोधात आपण लढा उभा केला पाहिजे आणि भाजपाचे हे कारस्थान हाणून पाडले पाहिजे, असेही ते म्हणाले.

..नंतर कायदा मात करेल !

निवडणूक आयोगाच्या बिहारमधील कार्यालयावर भारतीय जनता पार्टीचे घटक पक्ष असलेल्यांच्या ‘एनडीए’ च्या निषेधार्थ राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात प्रचंड प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते. प्रामुख्याने ‘इंडी’ आघाडीचा प्रचार करण्यासाठीच राहुल गांधी पाटण्यामध्ये आले होते. राहुल म्हणाले की, तुम्हाला जे करायचे आहे ते करा, पण नंतर कायदा तुमच्यावर मात करेल. कायदा तुम्हाला सोडणार नाही.

महाराष्ट्रात काय घडले पाहा..

समोरच्या हजारो मतदारांशी संवाद साधताना ते म्हणाले, की मी तुम्हाला हमी देतो, की नरेंद्र मोदी आणि त्यांचे आघाडीतील पक्ष कितीही मोठे असलात तरी कायदा तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही तुमचे काम करत नाही, हे प्रथम लक्षात घ्या. राहुल म्हणाले, की काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका झाल्या. त्यानंतर काही महिन्यांनी महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. आपल्या ‘इंडी’ आघाडीने लोकसभा निवडणुका जिंकल्या. पण, काही महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुका मात्र हरल्या, हे कशामुळे झाले याचा विचार करा आणि सतर्क राहा.

तब्बल एक कोटी नवे मतदार ?

त्यांनी पुढे स्पष्ट केले, की त्यावेळी आम्ही जास्त काही बोललो नाही. काही काळानंतर, आम्ही डेटा पाहण्यास आणि तपासण्यास सुरुवात केली. आम्हाला आढळले की लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत एक कोटी नवीन मतदार जोडले गेले. म्हणजे विधानसभा निवडणुकीत दहा टक्के अधिक मतदारांनी मतदान केले. जेव्हा आम्हाला हे मतदार कुठून आले, ते कोण आहेत, हे कळले तेव्हा आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या, असा खुलासाही त्यांनी केला. ज्या मतदार संघामध्ये मतदारांची संख्या वाढली, तेथे भाजपा जिंकला. सर्व नवीन मते भाजपाला गेली. असे कसे होऊ शकते? मग या डावपेचामधील गौडबंगाल समजले, असे राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा –  ‘अलमट्टी’ उंची वाढ विरोधात दिल्लीत मोर्चेबांधणी, विधीमंडळातील सर्वपक्षीय बैठकीत महत्त्वाचा निर्णय

निवडणूक आयोगाची चुप्पी..

यानंतर, जेव्हा आम्ही मतदार यादी आणि मतदानाचा व्हीडिओ मागितला, तेव्हा निवडणूक आयोग गप्प बसला. एकही शब्द बोलला नाही. एकदा नाही, तर अनेक वेळा त्यांना सांगितले की कायद्यानुसार आम्हाला मतदार यादी दिली पाहिजे. कायद्यानुसार व्हीडिओग्राफी आम्हाला दिली पाहिजे. पण निवडणूक आयोग ढिम्म ! आजपर्यंत महाराष्ट्राची मतदार यादी आम्हाला देण्यात आलेली नाही. याउलट, त्यानंतर व्हीडिओ देण्याचा कायदा बदलण्यात आला आहे, हाही एक वेगळाच भाग आहे, असे संताप जनक उद्गार त्यांनी काढले.

मतदार यादी मागणारे पत्र..

दरम्यान, महाराष्ट्राच्या निवडणुकीत अनियमिततेच्या आरोपांबाबत काँग्रेसने दि. २५ जूनरोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. पक्षाने आयोगाला आठवडाभरात महाराष्ट्र निवडणुकीची डिजिटल मतदार यादी मागितली होती. महाराष्ट्र आणि हरियाणामधील मतदानाचे व्हीडिओही मागितले होते. काँग्रेसने म्हटले होते, की ही जुनी मागणी आहे आणि निवडणूक आयोग ती सहज देऊ शकते. डेटा मिळाल्यावर आम्ही विश्लेषण करू आणि निवडणूक आयोगाशी चर्चा करू. यापूर्वी दि. १२ जूनरोजी निवडणूक आयोगाने मला पत्र लिहून निवडणुकीत हेराफेरीच्या आरोपांवर चर्चेसाठी बोलावले होते. त्याला उत्तर म्हणून काँग्रेसने आयोगाला पत्र लिहिले होते, त्याचे उत्तर मिळाले पण ते अतिशय निराशाजनक आहे, असेही त्यांनी सांगितले.

निवडणुका पारदर्शक आहेत..

राहुल गांधी यांना पाठवलेल्या पत्रात निवडणूक आयोगाने लिहिले आहे, की देशातील निवडणुका संसदेने पारित केलेल्या निवडणूक कायद्यानुसार, त्याचे नियम आणि निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार अतिशय काटेकोरपणे पार पाडल्या जातात. महाराष्ट्र निवडणूक प्रक्रिया विधानसभा मतदारसंघ पातळीवर केंद्रीकृत आहे. निवडणूक आयोगावर घेत असलेल्या आक्षेपावर आयोगाने खंत व्यक्त केली आहे.

राहुल गांधी यांचा थयथयाट कशासाठी ?

निवडणुका हरल्यानंतर जाग येणाऱ्या राहुल गांधी यांचा थरथराट कशासाठी ? असा प्रश्न भाजपाच्या प्रवक्त्यांनी चर्चेदरम्यान विचारला आहे. आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कामे, त्यांची दूरदृष्टी आणि सर्वांच्या विकासासाठी त्यांचे योगदान पाहता, भारतीय जनता पार्टी आत्ताच काय, पुढील दहा वर्षे निवडणूक हरणार नाही, असे या प्रवक्त्याने ठणकावले आहे. देशातील बळीराजा, महिला, युवा वर्ग डोळ्यासमोर ठेवून भाजपाची तळागाळापर्यंत पोहचण्याची व्यूहरचना असते, हे ऐनवेळी जागे होणाऱ्या राहुल गांधींना कोण सांगणार? असे हा प्रवक्ता म्हणाला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button