Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरे तातडीने सुरु करावीत; नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांची आयुक्तांकडे मागणी

आरोग्य मंदिरे उभारूनही नागरिक सुविधेपासून वंचित

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना घराजवळ प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात आलेली नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरे अनेक ठिकाणी अद्याप बंद किंवा अपूर्ण अवस्थेत असल्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. याबाबत शहर सुधारणा समितीचे सदस्य डॉ. सुहास कांबळे यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर करून तात्काळ कार्यवाहीची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, प्राधिकरण (काचघर चौक), आकुर्डी रेल्वे स्थानक परिसर, रावेत, मासुळकर कॉलनी, वल्लभनगर, चिखली (शरदनगर), पिंपळे गुरव तसेच भोसरी येथील संत तुकारामनगर आदी भागांमध्ये उभारण्यात आलेली नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरे अद्याप नागरिकांसाठी सुरू झालेली नाहीत. काही ठिकाणी उद्घाटन होऊनही प्रत्यक्ष आरोग्य सेवा सुरू नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

हेही वाचा : मुंबईत ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा

अनेक केंद्रांमध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसून, इमारतींची कामे अपूर्ण आहेत. काही ठिकाणी परिसर अस्वच्छ असून, अनधिकृत वापर सुरू असल्याच्याही तक्रारी आहेत. परिणामी, नागरिकांना अपेक्षित आरोग्य सेवा मिळत नसल्याने सार्वजनिक निधीच्या अपव्ययाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेषतः गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांसाठी ही आरोग्य मंदिरे अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.

लहान आजारांवर त्वरित उपचार, प्राथमिक तपासणी, औषधोपचार अशा सेवा घराजवळ मिळाव्यात, हा या संकल्पनेमागील उद्देश होता. मात्र, केंद्रेच सुरू नसल्याने नागरिकांना पुन्हा खासगी रुग्णालये किंवा दूरवरच्या दवाखान्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. कांबळे यांनी आरोग्य मंदिराची सर्व प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत, आवश्यक वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नेमावेत, बंद अवस्थेतील केंद्रे लवकरात लवकर सुरू करावीत, परिसराची स्वच्छता व सुरक्षा सुनिश्चित करावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणी केली. याबाबत आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सकारात्मक भूमिका घेत तातडीने हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

“नागरिकांच्या आरोग्यासाठी उभारण्यात आलेली नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरे अनेक ठिकाणी बंद किंवा अपूर्ण अवस्थेत असल्याची बाब आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निदर्शनास आणून देत गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांसाठी अत्यावश्यक असलेली ही आरोग्य केंद्रे तात्काळ सुरू करावीत, आवश्यक वैद्यकीय कर्मचारी व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी आम्ही मागणी केली आहे, याबाबत आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत. याबाबत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरात लवकर विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.”

– डॉ. सुहास कांबळे – सदस्य शहर सुधारणा समिती, नगरसेवक पिं. चिं. मनपा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button