श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचने
विषयाकडचा ओढा भगवंताकडे लावावा.

प्रपंचात ज्याला विश्वास म्हणतात, त्यालाच परमार्थात श्रद्धा म्हणतात. उणीव हेच प्रपंचाचे रूप असल्यामुळे तो पूर्ण झाला असे कधीच होणार नाही. समाधान हा मात्र पूर्णत्वाचा स्वभाव आहे. निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्त्विकता उत्पन्न होईल, आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल. अशा प्रकारे ‘ सर्वस्व ’ अर्पण करणे याचेच नाव यज्ञ होय. त्याग आणि भगवंताचे स्मरण हा यज्ञाचा खरा अर्थ होय. परमाार्थ साधला की बुवाचा देह पुष्ट होतो. तो काय दुधाचा रतीब लावतो ? छे:; भगवंताच्या आनंदाने त्याचा देह भरलेला असतो. परंतु साधकावस्थेमध्ये त्याचा देह कष्टामध्येच ठेवलेला असतो. खरे म्हणजे परमार्थी माणसाने दैन्यवाणे रहायचे कारणच नाही. पैसा असेल तर त्याने रोज श्रीखंडपुरी खावी; पण उद्या जर उपास पडला तर मात्र आजच्या पक्वान्नाची आठवण होता कामा नये.
हेही वाचा – भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने विजय मिळवला; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
सर्वांत गृहस्थाश्रम श्रेष्ठ सांगितला आहे. ज्याला हित करून घ्यायचे आहे त्याला गृहस्थाश्रमासारखा आश्रम नाही. पण लग्न करून सर्व काळ विषयांत घालवू लागलो आणि प्रपंचाची कर्तव्ये करायची राहिली तर मग लग्न करून काय साधले ? उद्योग करून पोट भरायचे हे खरे, पण नोकरी करून मालकाला सर्वस्व मानू लागलो आणि देवाला विसरलो तर नाही उपयोग. देवाला स्मरून नोकरी करावी. गृहस्थाश्रमात देव भेटणार नाही असे जो म्हणेल त्याचे खरे मानू नये. देव भेटेल याची खात्री बाळगावी. आपला भार सर्वस्वी भगवंतावर टाकावा. संकट, आनंद दोन्ही भगवंताला सांगावीत. ज्या स्थितीत भगवंताने ठेवले आहे त्या स्थितीत समाधान मानावे. अर्पणबुद्धीने सर्व कर्मे करावीत. ज्यात माझे मन मला खात नाही ते काम चांगले असे समजावे. कोणत्याही मनुष्याला जोपर्यंत या प्रपंचामध्येच सर्व काही आहे असे वाटत असते तोपर्यंत तो परमार्थापासून दूर असतो. वाईट लोक समाधानात दिसतात, पण खरे ते तसे नसतात. वाईट कृत्ये करणाऱ्याला कधी ना कधी तरी पश्चात्ताप झाल्यावाचून राहत नाही. एखादी बाई आपल्या सावत्र मुलाला ज्याप्रमाणे खायला-प्यायला घालते पण आतून तिचे त्याच्यावर प्रेम नसते, त्याप्रमाणे आपण परमार्थाला वागवतो. खरे म्हणजे आपले इथेच चुकते. आपला ओढा जो विषयाकडे आहे, तो भगवंताकडे लावला की परमार्थ साधला. ज्याने विषयातले सुख भगवंताकडे लावले, म्हणजे भगवंताच्या स्मरणात ज्याला सुखा-समाधानाचा लाभ झाला, त्याचे जन्माला येऊन खरे कल्याण झाले.
बोधवचन:- प्रपंचात जी आपली चिकाटी आहे. तिच्या एकचतुर्थांश चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली, तरी आपले काम भागेल.