मुंबई रेल्वे दुर्घटना: पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवासी ट्रॅकवर पडले, ५ जणांचा मृत्यू

मुंबई | मुंबईजवळील दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान आज सकाळी एक भीषण रेल्वे दुर्घटना घडली. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे जाणाऱ्या लोकल रेल्वेगाडीतून पडून ५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक प्रवासी जखमी झाले. या अपघाताचं प्रमुख कारण लोकलमधील प्रचंड गर्दी आणि प्रवाशांचं दरवाज्यात लटकून प्रवास करणं असल्याचं समोर येत आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सकाळी ९ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. लोकल रेल्वेगाडीत प्रचंड गर्दीमुळे अनेक प्रवासी डब्याच्या दरवाज्यात लटकत होते. याचवेळी लखनौला जाणारी पुष्पक एक्सप्रेस लोकलच्या बाजूने वेगाने जात होती. पुष्पक एक्सप्रेस आणि लोकल यांच्यातील घर्षणामुळे दरवाज्यात उभे असलेले काही प्रवासी खाली रेल्वे रुळांवर पडले. या अपघातात १० ते १२ प्रवासी पडल्याची प्राथमिक माहिती आहे, त्यापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा : ‘राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
घटनेची माहिती मिळताच काही प्रवाशांनी रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) कळवलं. आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तात्काळ कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी पाच प्रवाशांना मृत घोषित केलं. अन्य जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.