Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

मुसळधार पावसाचा तडाखा: पवना-मुळशी धरणं भरले; वाकड, सांगवी परिसराला पूराचा धोका

नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा: महापालिकासह जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन

पिंपरी-चिंचवड | पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ताम्हिणी, मावळ, मुळशी आणि खेड परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे मुळशी आणि पवना धरणे भरत आली असून, नदीपात्रात विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे वाकड, सांगवी आणि इतर नदीकाठच्या भागांना पूराचा गंभीर इशारा देण्यात आला आहे.

पवना धरण ९८% भरले, विसर्ग वाढणार

पवना धरण सोमवारी सायंकाळी ९८ टक्के भरले असून, आज रात्रीपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातून नदीत विसर्ग वाढवण्यात येणार आहे. यामुळे नदीकाठच्या परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. महापालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

मुळशी धरणातून विसर्गात मोठी वाढ

ताम्हिणी परिसरात प्रचंड पावसामुळे मुळशी धरण ९६.५०% भरले असून, विसर्गाचा वेग झपाट्याने वाढत आहे. दुपारी १ वाजता मुळा नदीत विसर्ग 5000 Cusecs वरून 10600 Cusecs करण्यात येणार आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

हेही वाचा      :        राष्ट्रहितार्थ काम करणारे देशभक्तच; समीर कुलकर्णी

लोणावळा शहरात २४ तासात १४२ मिमी पावसाची नोंद

मुंबई व उपनगरांसह घाटमाथ्यावरही पावसाचा जोर कायम आहे. लोणावळा शहरात सोमवारी २४ तासांत १४२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १५ ऑगस्टपासून पावसाने पुन्हा जोर धरला असून, १७ ऑगस्टपासून पावसाचा प्रकोप अधिकच वाढला आहे. या वर्षी आतापर्यंत लोणावळ्यात ४३७८ मिमी (१७२.३६ इंच) पावसाची नोंद झाली आहे.

नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्यांमधील पाणीपातळी वाढत असून, नदीकाठच्या वसाहतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने पूर नियंत्रणासाठी तयारी केली आहे. आयुक्त शेखर सिंग यांनी नागरिकांना शक्यतो घरातच थांबण्याचे आणि प्रशासनाच्या सूचना लक्षपूर्वक पाळण्याचे आवाहन केले आहे.

पुढील काही दिवस पावसाचा इशारा

हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस पुणे जिल्ह्यासह राज्यात अनेक भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडू नये, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button