कुणाला १, कुणाला ५, कुणाला १०, कुणाला १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंचा गंभीर आरोप

मुंबई | महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. अशातच ठाणे शहरात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा पार पडली. या सभेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. ‘कुणाला १ कोटी, कुणाला ५ कोटी, कुणाला १० कोटी, कुणाला १५ कोटींची ऑफर उमेदवारी मागे घेण्यासाठी दिली गेली’, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांवर केला आहे.
राज ठाकरे म्हणाले, आज निवडणूक शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपली. उद्या प्रचार थांबेल आणि मग सरकारकडून घराघरांत पैसे वाटायला सुरूवात होईल. आधी देखील पैसे वाटायला सुरूवात झाली. भाजपाचे लोक पैसे वाटत आहेत आणि शिंदेंच्या सेनेचे लोक ते पैसे पकडत आहेत, म्हणजे या सरकारमध्ये काय चालू आहे? हेच कळत नाही. त्या दिवशी मी कल्याण-डोंबिवलीत गेलो, काही मतदारसंघात फिरलो, प्रचंड हवा आहे तिकडे. खरं तर कल्याण-डोंबिवलीमधील काही लोकांना या ठिकाणी बोलवणार होतो. पण प्रचार शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. आज घरांघरात पाच-पाच हजार रुपये वाटत आहेत. मला हे समजत नाही की मग तुम्ही काय विकास केला? कल्याण -डोंबिवलीमध्ये गुलामांचा बाजार मांडलाय. पैसे वाटून अनेकांना उमेदवारी मागे घ्यायला लावली आहे.
एका प्रभागातील एकाच कुटुंबातील तीन उमेदवारांना १५ कोटींची ऑफर दिली गेली होती. १५ कोटींची ऑफर त्या कुटुंबातील तीन जणांनी नाकारली. दुसऱ्या एका महिला उमेदवाराला उमेदवारी मागे घेण्यासाठी ५ कोटींची ऑफर दिली गेली होती. आणखी एका उमेदवाराला १ कोटींची ऑफर दिली गेली होती. म्हणजे कुणाला १ कोटी, कुणाला ५ कोटी, कुणाला १० कोटी, कुणाला १५ कोटींची ऑफर दिली गेली, असं राज ठाकरे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस हे सगळं तुम्ही कुणासाठी करताय? पण काल मी म्हटलं ना की हे फक्त ससाणे आहेत, जाऊन फक्त पक्षीच मारून आणायचे आहेत यांना. मी त्या गौतम अदाणीचं प्रकरण काढलं, काय मिरच्या झोंबल्या. पुढे काय सुरू केलं? माझा आणि गौतम अदाणींचा फोटो, माझ्या घरी गौतम अदाणी येऊन गेलेत, रतन टाटा येऊन गेले आहेत, मुकेश अंबानी येऊन गेले आहेत, चित्रपटातले कलाकारही येऊन गेले आहेत. मग? माझ्या घरी येऊन गेले म्हणून यांची पापं झाकायची का मी? असा सवाल राज ठाकरेंनी केला.




