ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या जलसुरक्षेसाठी ‘पवना बंद जलवाहिनी’ प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करा; आमदार शंकर जगताप

विधिमंडळात 'औचित्याच्या मुद्द्या द्वारे' आग्रही मागणी

प्रकल्पाचा खर्च आता १,७०० कोटींवर; विशेष निधी देण्याची विनंती

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे नागरीकरण आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता, शहराच्या दीर्घकालीन जलसुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ‘पवना बंद जलवाहिनी प्रकल्प’ विहित कालमर्यादेत आणि तातडीने पूर्ण करावा, अशी आग्रही मागणी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी गुरुवारी विधिमंडळात ‘औचित्याच्या मुद्द्या द्वारे’ केली. या रखडलेल्या प्रकल्पासाठी शासनाने विशेष निधी आणि आवश्यक प्रशासकीय मंजुऱ्या जलद गतीने उपलब्ध करून द्याव्यात, याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

आमदार शंकर जगताप यांनी सभागृहात शहराच्या पाण्याच्या प्रश्नावर बोलताना सांगितले की, पवना धरण ते निगडी सेक्टर-२३ जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान सुमारे ३६ किलोमीटर लांबीची आणि १८०० मिमी व्यासाची बंद जलवाहिनी उभारण्यासाठी सन २००८ मध्ये ३९७.९२ कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र, स्थानिक आंदोलन, जमीन संपादनातील अडचणी, प्रशासकीय व तांत्रिक अडथळे, तसेच विविध न्यायालयीन व लवाद प्रक्रियांमुळे हा प्रकल्प गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ रखडला आहे.

हेही वाचा

पुणे–नाशिक महामार्गाच्या भूसंपादनासाठी राज्य शासनाला ‘साकडे’

१५ वर्षांत फक्त ४.५ ते ८ किमीचे काम!

या प्रकल्पावर आतापर्यंत सुमारे १७१ ते २०० कोटी इतका खर्च झाला असून, केवळ ४.५ ते ८ किलोमीटरपर्यंतचेच जलवाहिनीचे काम पूर्ण होऊ शकले आहे. तर सुमारे २८ ते ३२ किलोमीटरचे काम अद्याप प्रलंबित आहे. अनेक वर्षांच्या विलंबामुळे आणि वाढत्या बांधकाम खर्चामुळे या प्रकल्पाची सुधारित अंदाजित किंमत आता तब्बल १,२०० ते १,७०० कोटींवर पोहोचली आहे. हा वाढीव खर्च महापालिकेच्या आवाक्याबाहेर असल्याने शासनाने यासाठी विशेष आर्थिक मदत देणे गरजेचे आहे.

वार्षिक १.२९ टीएमसी पाण्याची होणार बचत

आमदार शंकर जगताप यावेळी म्हणाले , सध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला पवना धरणातून दररोज सुमारे ५१० ते ५३० एमएलडी पाणीपुरवठा होतो. हा बंद जलवाहिनी प्रकल्प पूर्ण झाल्यास खुल्या कालव्यातून आणि पात्रातून होणारे बाष्पीभवन, पाण्याची गळती व अनधिकृत पाणीउपसा पूर्णपणे रोखता येईल. यामुळे शहराला अतिरिक्त सुमारे १०० एमएलडी पाणी उपलब्ध होणार असून, वार्षिक अंदाजे १.२९ टीएमसी पाण्याची मोठी बचत होईल. शहराचे भविष्यातील संभाव्य पाणीसंकट टाळण्यासाठी हा प्रकल्प गेमचेंजर ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवडकरांना पुरेसे आणि हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी विशेष निधी मंजूर करावा आणि शासनाने एका निश्चित कालमर्यादेत हे काम पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी मी केली आहे. या प्रकल्पाचा पाठपुरावा मी सातत्याने करत राहीन.

– शंकर जगताप, आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button