Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रुग्णालय संलग्न औषध विक्री केंद्रातूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही, सक्ती करणाऱ्या रुग्णालय व डॉक्टरांवर होणार कारवाई

मुंबई : रुग्णांना त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषधे खरेदी करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कोणत्याही रुग्णालयाने किंवा डॉक्टरांनी रुग्णांना विशिष्ट औषधाच्या दुकानातूनच औषधे घेण्यास भाग पाडू नये, असे स्पष्ट निर्देश अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले. या निर्देशांचे उल्लंघन करणारी रुग्णालये, डॉक्टर आणि औषध विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मुंढे यांनी दिला.

अन्न व औषध प्रशासनाकडे राज्यातील काही खासगी रुग्णालयांविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना रुग्णालय परिसरातील किंवा रुग्णालयाशी संलग्न असलेल्या औषध विक्री केंद्रातूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती केली जात होती. तसेच काही ठिकाणी डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधांची चिठ्ठी रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना न देता थेट विशिष्ट औषधांच्या दुकानांकडे पाठविली जात असल्याचेही निदर्शनास आले होते.

या प्रकाराची गंभीर दखल घेत तुकाराम मुंढे यांनी सर्व रुग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक आणि औषध विक्रेत्यांना स्पष्ट निर्देश दिले. त्यानुसार कोणत्याही रुग्णाला विशिष्ट औषध दुकानातूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही. तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधांची चिठ्ठी रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांच्या हाती देणे बंधनकारक आहे.

हेही वाचा –  राज्यात शिवदुर्गा-शिवसंवाद दौरा, शिवसेना शिंदे पक्षाच्या महिला सक्रीय, ११ जिल्ह्यांतील ८३ विधानसभा मतदार संघातील महिलांशी संवाद साधणार

एफडीएने जारी केलेल्या निर्देशांनुसार, रुग्णांना कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषधे खरेदी करण्याची पूर्ण मुभा असल्याची माहिती रुग्णालयांनी देणे आवश्यक आहे. याशिवाय सर्व रुग्णालयांनी आपल्या दर्शनी भागात मराठी आणि इंग्रजी भाषेत सूचना फलक लावणे बंधनकारक केले आहे. या फलकावर रुग्णांना रुग्णालयातील औषध विक्री केंद्रातून औषधे खरेदी करण्याची सक्ती नसून ते कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषधे खरेदी करू शकतात, असा स्पष्ट उल्लेख करावा लागणार आहे.

डॉक्टरांनी औषधाची चिठ्ठी देण्यास नकार दिल्यास, विशिष्ट औषधाच्या दुकानातूनच औषधे घेण्याची सक्ती केल्यास किंवा अशा प्रकारचा कोणताही गैरप्रकार आढळल्यास संबंधित विभागीय कार्यालय अथवा अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि प्रमाणित औषधे सहज व रास्त दरात उपलब्ध करून देणे हे अन्न व औषध प्रशासनाचे कर्तव्य आहे. औषधे कुठून खरेदी करावीत हा ग्राहकांचा मूलभूत अधिकार असून, त्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. – तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button